मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये पाऊस आणि वादळी वारे वाहू लागल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबईत दोन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑफिसमधून घर गाठणाऱ्या मुंबईकरांचे हाल सुरु झाले आहेत. घाटकोपर या स्टेशनवर गर्दीच गर्दी झाली आहे.
ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला
मुंलुंड आणि ठाणे या दरम्यानचा ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रचंड वादळी वाऱ्यामुळे खांब कोसळला. धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी घाटकोपर या स्टेशनवर प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून येतं आहे. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर बॅनर कोसळल्याने ती वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती जी आता मार्गावर येते आहे. तांत्रिक अडचणही तिथे निर्माण झाली होती मात्र आता ही वाहतूक पूर्वपदावर येते आहे. सेंट्रल रेल्वेने पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
घरी पतरणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा
आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. त्यामुळे लाखो नागरीक आज आपापल्या ऑफिस आणि कार्यालयांमध्ये पोहचले होते. नियोजित वेळापत्रकानुसार लाखो प्रवासी संध्याकाळच्या वेळेस आपलं कार्यालयीन कामकाज पूर्ण करुन घराच्या दिशेला निघतात. पण ऐन गर्दीच्या वेळेस अचानक पाऊस आला. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा रेल्वे रुळावर बघायला मिळाल्या. बराच वेळ झाला तरी लोकल ट्रेन सुरु न झाल्यामुळे नागरीक लोकल ट्रेनच्या खाली उतरले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन पायी जाणं पसंत केलं.
ठाणे आणि मुलुंड दरम्यान झालेल्या बिघाडाची दखल मध्य रेल्वेने तातडीने घेतली आहे. या ठिकाणी कर्मचारी पोहचले आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ट्रेन कधी सुरु होतात या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत. जी ट्रेन येते आहे त्या ट्रेनमध्ये गर्दी असूनही लोक जमेल तसा प्रवास करत आहेत. तर काही लोक प्रचंड गर्दी असल्याने वाट बघत ताटकळत उभे आहेत. घाटकोपर मधील होर्डिंग कोसळल्याची घटनाही घडल्याचं समोर आलं आहे. तर मुंबईतल्या प्रमुख भागांत धूळ आणि पावसाचं साम्राज्य आहे.