मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन म्हटली जाते. लोकल ट्रेनच्या माध्यमांतून रोज लाखो प्रवासी ये-जा करत असतात. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे असे मुंबईला जोडणारे लोकल रेल्वे मार्ग आहेत. ज्यावरुन धावणाऱ्या लोकल ट्रेन्समधून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. अशात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी नाही. मध्य रेल्वेसाठी काम करणाऱ्या सुनील नैनानी या तिकिट चेकरने मागच्या सहा महिन्यात १ कोटींपेक्षा जास्त दंड वसूल करुन कर्तव्य काय असतं त्याचा आदर्श घालून दिला आहे.
मध्य रेल्वेने मागच्या सहा महिन्यांमध्ये १ कोटींहून जास्त दंड वसूल करणऱ्या टीसींची नावं पोस्ट केली आहेत. ज्यामध्ये सुनील नैनानी यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मागच्या सहा महिन्यात त्यांनी १ कोटी ६२ लाखांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या X अकाऊंटवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकात तैनात असलेल्या टीटीई सुनील नैनानी यांनी सध्याच्या आर्थिक वर्षात वैयक्तिक तिकीट तपासणीच्या माध्यमातून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल रेल्वेला मिळवून दिला आहे. त्यांनी यावर्षी १ एप्रिल ते १३ ऑक्टोबर दरम्यान १० हजार ४२६ विनातिकीट प्रवाशांकडून १ कोटी २ हजार ८३० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी देखील सुनील नैनानी यांनी १८,४१३ विनातिकीट प्रवाशांकडून १ कोटी ६२ लाखांचा दंड वसूल केला होता.
सुनील नैनानी यांच्यासह एकूण चारजणांनी मागच्या आर्थिक वर्षात कशी कामगिरी केली त्याविषयीची पोस्ट X वर केली आहे. मध्य रेल्वेच्या या पोस्टमध्ये हे सांगण्यात आलं आहे की चौघांनीही मागच्या आर्थिक वर्षात एक कोटींपेक्षा जास्त दंड वसुली करुन मध्य रेल्वेला प्रत्येकी १ कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवून दिला आहे.
२०२२-२०२३ या वर्षात सर्वाधिक दंड वसुल करणारे टीसी
सुनील नैनानी: सुनील नैनानी यांनी मागच्या सहा महिन्यात १८ हजार ४१३ विनातिकिट प्रवाशांकडून १ कोटी ६२ लाखांचा दंड वसूल केला आहे.
भीम रेड्डी : भीम रेड्डी यांनी मागच्या सहा महिन्यात ११ हजार १७८ विनातिकीट प्रवाशांकडून १ कोटी ३ लाखांचा दंड वसूल केला आहे.
एम एम शिंदे: एम एम शिंदे यांनी ११ हजार १४५ विनातिकीट प्रवाशांकडून मागच्या सहा महिन्यात १ कोटींचा दंड वसूल केला आहे.
आर.डी. बहोत : आर. डी. बहोत यांनी ११ हजार २९२ विनातिकीट प्रवाशांकडून १ कोटींचा दंड मागच्या सहा महिन्यात वसूल केला आहे. मध्य रेल्वेने या चारही जणांची नावं एक्स वर पोस्ट करत त्यांचं कौतुक केलं आहे.