मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या उपनगरीय मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परंतु, रविवारी राम नवमी असल्याने प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी बोरिवली – अंधेरीदरम्यान अप धीम्या मार्गावरील ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल अप जलद मार्गावर चालवण्यात येतील. राम मंदिर स्थानकात जलद मार्गावर फलाट नाही. त्यामुळे फलाटाअभावी रात्रीच्या वेळी राम मंदिर स्थानकात लोकल थांबा नसेल.

रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही दिवसकालीन ब्लाॅक नाही.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि नंतर मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत सुटणाऱ्या / येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबाने पोहोचतील.

ट्रान्स हार्बर मार्ग

कुठे : ठाणे आणि वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत वाशी / नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स – हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत सुटणाऱ्या वाशी / नेरुळ / पनवेलसाठी डाऊन मार्गावरील लोकल सेवा आणि पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली – राम मंदिर स्थानकांदरम्यान अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत

परिणाम : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत बोरिवली – अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावरून चालविण्यात येतील. राम मंदिर स्थानकात फलाटाअभावी येथे लोकल थांबा नसेल. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नसेल.