दुसऱ्या लाटेतही करोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत आहे. मुंबईतील दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला आहे. मुंबईतील पॉझिटिव्ही रेट कमी झाल्यानं काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आलेली आहेत. मात्र, मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यासंदर्भात आता महापौरांनी भूमिका स्पष्ट केली. “तिसरी लाट आली, तर ती सगळ्यांसाठी भयंकर असेल,” असा इशाराही महापौरांनी तज्ज्ञांच्या माहितीच्या आधारावर दिला.
“महापालिकेनं प्रत्येक वार्डमध्ये दोन भरारी पथकं नेमली आहेत. कुठेही लसीकरण सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे भेट देणं. दिल्या जाणाऱ्या लशीची एक कुपी (वाईल्स) ताब्यात घेणं. लसीकरण कोण करत करतंय आदी माहिती घेऊन महापालिकेच्या प्रत्येक वार्डकडे असली पाहिजेत. सीरम इन्स्टिट्यूटला पत्र दिलं आहे. हिरानंदानी सोसायटीत देण्यात आलेल्या लशींची एक कुपी सीरमकडे पाठवण्यात आली असून, ती लसच आहे का? याची खात्री करून घेतली जात आहे. आता पोलीस आणि महापालिका चौकशी करत आहे. कांदिवलीतील प्रकरणानंतर लोक दक्ष झाले आहेत. जी लस दिली जात आहे, त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली आहे की, नाही. याबद्दल नागरिकांनी चौकशी करावी,” असं आवाहन महापौरांनी केलं.
हेही वाचा- …तर सोसायट्यांमध्येही महापालिका लसीकरण सुरू करणार; महापौर पेडणेकर
“महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी कालच याबद्दलची महापालिका प्रशासनाची भूमिका मांडली आहे. आजही मुंबईत पाचशे ते सहाशेच्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या आणखी कमी व्हायला हवी. धारावीत शून्य रुग्णवाढ आहे. वरळीत काल एकच रुग्ण आढळून आला. याचा अर्थ मुंबईतील संसर्ग कमी होतोय. रुग्णसंख्या कमी झाली की विचार करू. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी देण्याचा विचार करावाच लागेल, पण इतरांच्या जीवांवर बेतेल अशा पद्धतीने ना महापालिका वागणार ना राज्य सरकार,” असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
हेही वाचा- उद्यापासून पूर्वनोंदणीशिवाय लस; लसीकरण केंद्रावर रांगा लागण्याची शक्यता
तिसरी लाट सर्वांसाठी भयंकर असेल
“आज प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डमध्ये एक केंद्र असावं म्हणून दोन केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. नगरसेवकांच्या केंद्रामध्ये लसी द्यायला हरकत नाही. ज्या सोसायट्यांना सोसायटीमध्येच लसीकरण शिबिरं आयोजित करायची आहे. त्यांनी महापालिकेकडे संबंधित माहिती द्यायला हवी. आता तज्ज्ञ सांगत आहे की, तिसरी लाट आली, तर ती सगळ्यांसाठी भयंकर असेल. आता त्या विषाणूचं स्वरूप बदलत आहे. त्यामुळे सगळ्यांनी कुटुंबांची काळजी घ्यायला हवी. जर नागरिकांनी काळजी घेतली, तर आपण ज्याप्रमाणे दुसरी लाट थोपवण्यात यशस्वी झालो, तसंच तिसऱ्या लाटेतही यशस्वी होऊ,” असं महापौर म्हणाल्या.