मुंबई : गुरुवारी संध्याकाळी मुंबई आणि उपनगरांत अचानक आलेल्या पहिल्याच पावसाने कार्यालयातून घराकडे परतणाऱ्या नोकरदार वर्गाला धारेवर धरले. जलधारांमुळे वातावरणात सुखद गारवा आला असला, तरी उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाली. अनेक भागांत रस्ते वाहतूकही मंदावली.
सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास वाशी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली आणि ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर सेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. वाशी ते सानपाडा दरम्यान लोकल सेवा बंदच ठेवण्यात आल्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला. अनेकांनी रस्ते मार्गाचा प्रवास निवडला. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर आणखी ताण आला.
काही वेळाने ओव्हरहेड वायर दुरुस्त करून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र या मार्गावरील गाडय़ा उशिराने धावत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला. यापाठोपाठ सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा मार्गावरील लोकलही रात्री आठ नंतर पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. पावसामुळे तांत्रिक समस्या निर्माण होऊन या मार्गावर ओव्हरहेड वायरला विद्युत पुरवठा सुरळीत होत नव्हता. त्यामुळे लोकलचा वेग मंदावला आणि धीम्या बरोबरच जलद लोकलही उशिरा धावू लागल्या. परिणामी लोकल गाडय़ांना प्रवाशांची एकच गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत ही परिस्थिती होती.
गुरुवारी, रात्री ८.३० वाजेपासून मुंबईतील वरळी, माटुंगा, माहीम, जोगेश्वरी, अंधेरी, कांदिवली, बोरिवली, दहिसर, दादर, शीव, घाटकोपर, मुलुंड या भागात रिमझिम पाऊस बरसला. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वीज कडाडल्या. पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागात मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती आहे. दोन दिवसात मोसमी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पूर्वमोसमीची धडक..
समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे सध्या महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांतही पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली . ठाणे, रायगड जिल्हा, मुंबई आणि उपनगरांतील काही भागात गुरुवारी संध्याकाळी पावसाची हजेरी लागली. त्यामुळे कार्यालयात भर उन्हात पोहोचलेल्या नोकरदार वर्गाला छत्रीविना घरी परतताना पावसाने भिजवून सोडले. रेल्वे विस्कळीत झाल्याने स्थानकांवर तुडुंब गर्दी होती.