गेल्या १८ वर्षांपासून मध्य रेल्वेमार्गावर चाललेले डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाचे काम आता खरोखरच अखेरच्या टप्प्यात आले असून शनिवारी मध्य रेल्वेने या कामाच्या चाचणीसाठी घेतलेला जंबो ब्लॉक सुफळ संपूर्ण ठरला असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शनिवारच्या रात्री मध्य रेल्वेने सीएसटी-कल्याणदरम्यान सर्व मार्गावरील डीसी विद्युतप्रवाह बंद करून एसी विद्युतप्रवाह चालू केला. रात्रभरात या मार्गावर चार वेळा चाचण्या केल्यानंतर सकाळी पुन्हा एकदा हा विद्युतप्रवाह ‘डीसी’वर वळवण्यात आला. भारतीय रेल्वेच्या इतिहासात हा प्रयोग पहिल्यांदाच झाला असून तो यशस्वी ठरल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले.
डीसी-एसी परिवर्तनादरम्यान सीएसटी ते कुर्ला या मार्गावर ३४ ठिकाणी जंपर्स बसवण्यात आले होते. एका प्रकारचा विद्युतप्रवाह बंद करून त्याजागी दुसऱ्या प्रकारचा विद्युतप्रवाह जोडण्यासाठी हे जंपर्स आवश्यक असतात. त्यासाठी हे जंपर्स उघडून त्यांना संबंधित विद्युतप्रवाहाशी जोडावे लागते. शनिवारी रात्री मध्य रेल्वेच्या विद्युत विभागाचे अभियंते, कर्मचारी या प्रत्येक जंपरजवळ कार्यरत होते. जंपर उघडून डीसी विद्युतप्रवाहाऐवजी तो एसी विद्युतप्रवाहाला जोडण्यात आला. सर्व चाचण्या झाल्यानंतर तो पुन्हा उघडून मध्य रेल्वेमार्ग पुन्हा डीसी विद्युतप्रवाहावर पूर्ववत करण्यात आला.
या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. मध्य रेल्वेने डीसी-एसी परिवर्तनाचे आपले काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले. मध्य रेल्वेवर याआधीच घातलेल्या काही वेगमर्यादा वगळता नवीन र्निबध न घालता या चाचण्या करण्यात आल्या. सध्या कमाल वेग ८० किलोमीटर प्रतितास एवढा आहे. मात्र एसी विद्युतप्रवाहावर या गाडय़ा १०० किमी प्रतितास या वेगाने धावतील. चाचणीदरम्यान या वेगाची यशस्वी चाचणीही घेण्यात आली. कोठेही काहीच समस्या न आल्याने आता मध्य रेल्वे डीसी-एसी परिवर्तनासाठी सक्षम आहे, असे या अधिकाऱ्यानी सांगितले. आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र येणे बाकी असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यामुळे आता नव्या बंबार्डिअर गाडय़ा मध्य रेल्वेमार्गावर येण्यातील एक अडथळा दूर झाला आहे. एसी विद्युत-प्रवाहावर चालणाऱ्या या सर्व नव्या गाडय़ा आता मध्य रेल्वेवरही चालतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
डीसी-एसी परिवर्तन सुफळ संपूर्ण!
गेल्या १८ वर्षांपासून मध्य रेल्वेमार्गावर चाललेले डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाचे काम आता खरोखरच अखेरच्या टप्प्यात आले असून शनिवारी मध्य रेल्वेने या कामाच्या चाचणीसाठी घेतलेला जंबो ब्लॉक सुफळ संपूर्ण ठरला असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
First published on: 22-12-2014 at 02:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train tempo likely to increase