मुंबई : मध्य रेल्वेचा लेटलतीफ कारभार नित्याचा झाला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना प्रवास करताना दररोज विलंब होत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन दिशेला जाणाऱ्या धीम्या रेल्वे मार्गाच्या रुळाला शुक्रवारी दुपारी १.०५ वाजेच्या सुमारास तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही दिशेकडील लोकल सेवा खोळंबली. या घटनेमुळे लोकलचा वेग मंदावला.
हेही वाचा : मुंबई: भटके श्वान, मांजरींच्या तक्रारीसाठी महापालिकेचे मोबाइल ॲप
संबंधित घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, लोकल भायखळ्यावरून जलद डाऊन दिशेने वळवण्यात आल्या. त्यामुळे सीएसएमटीपासून कल्याणपर्यंत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यानंतर, माटुंगा येथे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुपारी १.३९ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र यामुळे धीम्या मार्गावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना तब्बल २० ते ३० मिनिटे लोकल उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.