मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे काम करण्यासाठी, सोमवारी रात्री १२.३० ते मंगळवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लाॅक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत १५० ते १७५ लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच ४ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना अनियमित वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे. सोमवारपासून घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना असुविधांना तोंड द्यावे लागेल.
हेही वाचा >>> भ्रष्टाचाराचे आरोप असलेले ९६ पालिका अधिकारी पुन्हा नोकरीवर, निवडणूकीच्या तोंडावर निलंबन मागे
गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या प्रकल्पाचा अंतिम टप्पा सुरू आहे. ३० सप्टेंबरपासून राम मंदिर रोड, गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन लोकल आणि अप आणि डाऊन या चारही मार्गांवर ताशी ३० किमी वेगाचे निर्बंध लागू केले जातील. परिणामी, अंदाजे १५० ते १७५ लोकल रद्द केल्या जातील. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्याशिवाय गोरेगाव लूप मार्गिका उपलब्ध नसल्यामुळे गोरेगावहून सकाळी धावणाऱ्या चारही जलद लोकल सेवा रद्द राहतील. तर, पुढील चार दिवस अनेक लोकल रद्द केल्या जातील. तर, ठराविक ब्लॉक कालावधी वगळता, ४ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यास सुरुवात होईल. प्रकल्पासाठी एकूण १२८.३७ तास कार्यरत ब्लॉक्सची आवश्यकता आहे. त्यापैकी ४३.३० तास शिल्लक आहेत, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.