सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली मुंबईतील लोकल रेल्वे सेवा दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर पुन्हा बंद करण्यात आली. मात्र, त्यानंतर अद्यापही सर्वसामान्यांसाठी घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आलेली नाही. यासंदर्भात काही नेत्यांनीही आवाज उठवला होता. मात्र, करोनाचं संकट पूर्णपणे टळेपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा विचार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. असं असतानाच आता सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोकल प्रवासास बंदी असल्याने होत असलेल्या त्रासाबद्दल या तरुणाने रेल्वेच्या कार्यालयातून खंत व्यक्त केली असून, हाच व्हिडीओ ट्वीट करत मनसेनं ठाकरे सरकारला सवाल केला आहे.
सोशल मीडियावर मुंबईत एका करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वगळता इतरांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र, असं असतानाही या तरुणाने लोकलमधून प्रवास केला. परेल स्थानकावर टीसीने त्याला पकडलं. त्यानंतर त्याने व्हिडीओ करून लोकल प्रवासाच्या बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली. तसंच सरकारचंही लक्ष वेधलं. या तरुणाचा व्हिडीओ मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि “बहिरं सरकार ऐकेल का???,” असा सवाल ठाकरे सरकारला केला आहे.
हेही वाचा- उद्यापासून (२८ जुलै) राज्यात कठोर निर्बंध लागू; जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद?
तरुणाचं म्हणणं काय आहे?
एक दीड वर्षांपासून घरी होतो. आता नोकरी मिळाली आहे. आज नोकरीचा दुसराच दिवस आहे. परेल स्थानकावर आल्यानंतर टीसीने मला पकडलं. यात टीसीची काहीच चुकी नाही. ते त्यांचं काम करताहेत. पण, सरकारला जाग कधी येणार आहे? सर्वसामान्य माणूस रोज कमावतात आणि खातात. त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी कुठे जायचं? आज माझ्या खात्यावर चारशे रुपये आहेत. खूप मेहनतीनंतर नोकरी मिळाली आहे. तिकीट मिळत नाहीत, पासही मिळत नाहीत. पण सरकारी नोकरदार नाही म्हणून आम्ही काय गुन्हेगार आहोत का? आमच्याकडे आज पैसे नाहीत आणि तरीही आमच्याकडून दंड वसूल केला जात असेल. सरकार अशी लुबाडणूक करत असेल, तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी काय करायचं? लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. लोक फिरत आहेत मग का कोविड कोविड करत बसायचं?, असं या तरुणाने म्हटलं आहे.
बहिर सरकार ऐकेल का??? pic.twitter.com/BJx1zA545e
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 27, 2021
मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले होते?
सरकारने पाच टप्प्यात निर्बंध शिथिल करण्याचे आदेश काढल्यानंतर मुंबईतील लोकल सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात होती. मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात असतानाच काही दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकलबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. “करोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.