Mumbai Local Train Update Overhead Wire Break: लोकसत्ता खास प्रतिनिधी : कल्याण -ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ओव्हरेडमध्ये मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याणकडे, सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली. कल्याण, कसारा, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल डोंबिवली, कोपर, दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान खोळंबल्या. नोकरदार घरी परतीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत होते. एक तासाहून अधिक काळ लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

कल्याण लोकल रद्द करून त्या डोंबिवली रेल्वे स्थानकातून पुन्हा सीएसएमटीकडे सोडल्या जात होत्या. मंगळवारी साडे सात वाजण्याच्या दरम्यान ठाकुर्ली-कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर ओव्हरहेडमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सीएसएमटीकडून कल्याण येणाऱ्या लोकल पाठोपाठ डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा दिशेने रखडल्या. एक तास झाला तरी लोकल जागची हालत नसल्याने अनेक प्रवाशांनी काळोख असल्याने मोबाईल विजेरीच्या साहाय्याने रेल्वे मार्गातून दिवा रेल्वे स्थानकाकडून डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानकाकडे प्रवास सुरू केला. ठाकुर्ली जवळील प्रवासी कल्याणच्या दिशेने रेल्वे मार्गातून पायी जात होते. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कोपर, दिवा, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली होती.

हेही वाचा : Shivneri : विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे आता शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’, भरत गोगावलेंची घोषणा

कल्याणकडे जाणारी धिम्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वेने धिम्या लोकल जलदगती मार्गावरून कल्याणकडे वळविल्या. एकाच मार्गिकेतून जलद, धिम्या लोकल धावू लागल्याने जलदगती मार्गावरील कल्याणकडे जाणारी लोकल सेवा यामुळे विस्कळीत झाली. धिम्या लोकल जलद मार्गावरून कल्याणकडे धावत असताना कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात न थांबल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले. त्यांना डोंबिवली, कल्याण स्थानकात जाऊन पुन्हा माघारी परतावे लागले.

या गोंधळात कल्याणकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धिम्या लोकल अतिजलद मार्गावरून सोडण्यात येऊ लागल्या. त्यामुळे मुंबईकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. एक तासाहून अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. अगोदर घामाच्या चिकचिकाट्याने प्रवासी हैराण होते. त्यात लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा संताप झाला होता.

ठाकुर्ली-कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान कल्याणकडे येणाऱ्या धिम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. संध्याकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. तांत्रिक बिघाड दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे कल्याणकडे जाणारी लोकल सेवा बंद आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली.

मध्य रेल्वेने काय म्हटलं?

“ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान लोकलसेवा विस्कळीत झाल्यानंतर मध्य रेल्वेने याबाबत एक्सवर माहिती देत म्हटलं आहे की, काही तांत्रिक समस्येमुळे ओव्हरहेड उपकरणांमध्ये वीज बिघाड झाल्याने ७:०८ वाजल्यापासून ठाकुर्ली आणि कल्याण विभागादरम्यान डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली आहे”, असं मध्य रेल्वेने म्हटलं आहे.

लोकलसेवा पूर्ववत कधी होणार?

ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मंगळवारी धिम्या मार्गावरून धावत असणाऱ्या लोकलची अचानक ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. याचा परिणाम रात्री उशिरापर्यंत दिसून येत असून त्यामुळे प्रवाशांची गर्दी झाली आहे. दरम्यान, विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करण्यात येणार असून लवकरच या मार्गावरील लोकलसेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.