करोनामुळे मुंबईकरांना निर्बंधांबरोबरच प्रवास करतानाही हाल सोसावे लागत आहे. दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्यांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, दुसरी लाट ओसरत असून, नागरिकांनाकडून लोकल प्रवासास परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. असं असतानाही अद्याप बंदी हटवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबईकरांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधत भाजपाने राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. “राज्य सरकारने मुंबई व उपनगरातील सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची तत्काळ परवानगी द्यावी, अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा ५ हजार रुपये द्यावेत”, अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. उपाध्ये म्हणाले,”राज्य सरकारनं गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो, त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. करोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुंबईतील प्रवासी खासगी वाहतुकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव आहे अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागली आहे”, असं केशव उपाध्ये म्हणाले.
“मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून साथ दिली आहे. या सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीवच नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरी रेल्वे प्रवास बंद असल्याने याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे”, अशी भूमिका उपाध्ये यांनी मांडली. “लस खरेदीसाठी राज्य सरकारने सात हजार कोटी रुपये राखून ठेवले असल्याचं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं होतं. हे सात हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत व सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा”, असा सल्ला उपाध्ये यांनी सरकारला दिला आहे.