मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची घडी मंगळवारीही जैसे थेच होती. मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच कूर्मगतीने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छित वेळेत लोकल मिळत नव्हती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढत होती. परिणामी, प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दरम्यान, मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.
हेही वाचा : संलग्न झोपु योजनांसाठी यापुढे परवानगी नाही! मंजूर योजनांना मात्र अभय; पालिकेकडून नरमाईची भूमिका?
मुंबई शहर, उपनगरांत आणि ठाण्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून कडक ऊन पडले आहे. त्यामुळे लोकल वेळेत धावणे अपेक्षित होते. मात्र लोकल कूर्मगतीने धावत असल्यामुळे प्रवाशांना विलंब यातना सहन कराव्या लागत आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजेनंतर सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक लोकल दोन स्थानकांदरम्यान रखडलेल्याचे निदर्शनास आले. ठाणे, मुलुंड, भांडुप येथे अप धीम्या लोकल ३० ते ४५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. तसेच काही रखडलेल्या धीम्या लोकल जलद मार्गावरून धावत आहेत. त्यामुळे धीम्या लोकलच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, मंगळवारी कोणताही तांत्रिक बिघाड किंवा कोणती समस्या नसल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.