सिग्नलमधील बिघाडामुळे पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील बोरिवली, विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल विलंबाने धावत आहेत. सकाळी ९.३० वाजता अंधेरी जवळील सिग्नलमध्ये बिघाड झाला. यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
गुरुवारी मानखुर्द जवळच पहाटे ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर अडीच तास विस्कळीत होती. सकाळी कामावर जाणाऱ्याना त्याचा फटका बसला होता. त्यानंतर शुक्रवारी पश्चिम उपनगरीय प्रवाशांनाही विलंबाने धावत असलेल्या लोकल सेवांना सामोरे जावे लागले. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अंधेरी स्थानकाजवळ डाउन धीम्या मार्गावरील सिग्नलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे या भागात ‘ए’ मार्करवर सिग्नल यंत्रणा ठेवून लोकल गाड्याचा वेग कमी करण्यात आला. वेग कमी झाल्याने बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल विलंबाने धावू लागल्या आहेत.
सिग्नलच्या दुरुस्तीचे काम सकाळी १०.३० पर्यंत पूर्ण झाले. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास बराच वेळ लागल्याने लोकलच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला. त्यामुळे लोकल गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली.