मुंबई :पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – गोरेगाव स्थानकांदरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.३० पासून ते रविवारी सकाळी ११.३० पर्यंत १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, पश्चिम रेल्वेच्या धीमा मार्ग आणि हार्बर मार्गिकेवरील सेवा विस्कळीत होईल. तसेच ब्लॉक कालावधीत राम मंदिर स्थानकात लोकल थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होईल.

जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यानच्या पुलाचे काम करण्यासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा आणि काही मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे. सर्व अप आणि डाऊन धीमी मार्गिका अंधेरी आणि गोरेगाव / बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. फलाटाअभावी राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाहीत.

हेही वाचा : Dahisar Assembly Election 2024: दहिसरमध्ये अटीतटीचा सामना घोसाळकर विरुद्ध चौधरी

मध्य रेल्वेवरून सुटणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा फक्त अंधेरीपर्यंतच धावतील. तसेच काही चर्चगेट- गोरेगाव/बोरिवली धीम्या लोकल अंशतः रद्द होतील आणि अंधेरीहून पूर्ववत केल्या जातील. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मेल / एक्स्प्रेस गाड्या १० ते २० मिनिटे विलंबाने धावतील. तर ब्लॉक कालावधीत राम मंदिर येथे अप आणि डाऊन दिशांना कोणतीही लोकल उपलब्ध नसेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.