सतत कोलमडणारे वेळापत्रक, वाढती प्रवासी संख्या, लोकल ट्रेनमधील वाढती गर्दीयामुळे मुंबईमधील लोकल ट्रेनचा प्रवास दिवसोंदिवस अधिक अधिक त्रासदायक होत चालला आहे. त्यातच आता लोकल ट्रेनने प्रवास महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लोकल ट्रेनमधील महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाचे प्रमाण मागील दोन वर्षांमध्ये ८७ टक्क्यांनी वाढले आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुंबई लोकलमध्ये लैंगिक अत्याचार आणि छेडछाड झाल्याच्या ११८ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. २०१६ साली पहिल्या नऊ महिन्यांमधील हाच आकडा ६३ इतका होता तर २०१७ साली हा ७४ इतका होता. एकंदरितच महाराष्ट्रामध्ये रेल्वेत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीमध्ये दिसून येत आहे.
मागील दोन वर्षांची आकडेवारी विचारात घेतल्यास, मुंबई विभागात रेल्वेमध्ये महिलांवर होणाऱ्या बलात्कार आणि छेडछाडीचे प्रमाण हे पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या सर्व विभागांच्या एकत्रित आकडेवारीपेक्षा अधिक आहे. २०१६ मध्ये पहिल्या नऊ महिन्यांमध्ये राज्यभरात रेल्वेत होणाऱ्या छेडछाडीच्या ८७ प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. तर राज्यभरातील हाच आकडा २०१७ मध्ये ९५ इतका होता. या वर्षी महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते सप्टेंबर महिन्यादरम्यान ट्रेनमध्ये छेडछाड होण्याच्या प्रकरणांचा आकडा १५१ इतका आहे. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना मुंबईमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ट्रेनमध्ये होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांची आकडेवारी जास्त असली तरी गुन्हे सोडवण्याचे प्रमाणही मुंबई विभागात जास्त असल्याचे सांगितले. मुंबईमध्ये दाखल होणाऱ्या ट्रेनमधील छेडछाडीच्या गुन्ह्यांपैकी ८५ टक्के तक्रारींचे पूर्ण निवारण करुन आरोपींना शिक्षा होते असे पोलिस अधिकारी म्हणाले.
मुंबईतील ट्रेनमध्ये वाढणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भात माहिती देताना या गुन्ह्यांमधील बरेच आरोपी हे पहिल्यांदाच गुन्हा करणारे म्हणजे फर्स्ट टाइम ऑफेण्डर असतात असे पोलिसांनी सांगितले. तसेच या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या मोठी आहे. तर दुसरीकडे महिला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल उघडपणे बोलू लागल्या असल्याने ही आकडेवारी वाढल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. अक्षरा या समाजसेवी संस्थेच्या नंदिता शाह यांनी, महिला अशाप्रकरणांबद्दल उघडपणे वाच्यता करत आहेत हा बदल सकारात्मक आहे. अत्याचार करणाऱ्यांना आता महिला चांगलाच धडा शिकवताना दिसत असल्याचे मत नोंवदले.