मुंबई : एकीकडे मध्य रेल्वे प्रशासन समाज माध्यमावरून विविध ध्वनिचित्रफीती प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. मात्र वास्तवात मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना मानसिक, शारीरिक यातना सहन कराव्या लागत आहेत. नुकताच डब्याअभावी एलटीटीवरून थिवीकडे जाणारी रेल्वेगाडी सोडण्यास तब्बल तीन तासांचा उशीर झाला. यात लहान मुले, वयोवृद्ध, महिला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नियमित रेल्वेगाड्यांसह विशेष रेल्वेगाड्या भरगच्च भरून मार्गस्थ होत आहेत. त्यात मध्य रेल्वे अचानकपणे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलून, प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन बिघडवत आहे. गाडी क्रमांक ०११२९ एलटीटी-थिवी रेल्वेगाडी रात्री १० वाजता सुटते. मात्र २० एप्रिल रोजी ही रेल्वेगाडी सुटण्याच्या ११ तास आधी वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार ही गाडी रात्री २ वाजता सोडण्याचे निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे महिला वर्ग, वृद्ध, लहान मुले रात्री २ वाजेपर्यंत रेल्वेगाडीच्या प्रतिक्षेत स्थानकावर खोळंबले होते. आरक्षित तिकीट न मिळालेले अनेक प्रवासी या गाडीसाठी थांबले होते. रात्रीचे ३ वाजले तरी गाडी न आल्याने प्रवाशांनी नियंत्रण कक्षाकडे विचारणा केली. त्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी स्थानकावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रेल्वेगाडी न आल्यास, इतर रेल्वेगाड्यांचा खोळंबा करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला. त्यानंतर डब्यांची व्यवस्था करून २१ एप्रिल रोजी पहाटे ५.१० वाजता सोडण्यात आली.
हेही वाचा : सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराचं प्रकरण, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेठीस धरले आहे. डब्याअभावी रेल्वेगाडी उशिराने येते. रेल्वे प्रशासनाकडे डबे नसतील, तर त्यांनी रेल्वेगाडीचे नियोजनच करू नये. प्रशासन प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे. – सुदर्शन जाधव, प्रवासी
एलटीटी-थिवीमच्या वेळापत्रकात बदल करून, ही रेल्वेगाडी रात्री २ वाजता सुटणार होती. याबाबतची माहिती प्रवाशांना याआधीच दिली होती. मात्र, या रेल्वे गाडी मधील डब्यांच्या शंटिंगला अधिक वेळ लागल्यामुळे, ही गाडी रात्री २ ऐवजी पहाटे ५ वाजता सुटली. – डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे