करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला. बांधकामक्षेत्रही यातून सावरू शकलं नाही. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा मालमत्ता खरेदी विक्रीला चालना मिळत असल्याचं दिसत आहे. मुंबईतील लक्झरी प्रॉपर्टी खरेदी-विक्रीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत सर्वाधिक लक्झरी प्रॉपर्टी खरेदी-विक्री झाल्याचं समोर आलं आहे. प्रतिष्ठीत व्यक्ती, उद्योगपती आणि बॉलिवूड कलाकारांनी खरेदी विक्रीत उत्साह दाखवला आहे. जवळपास ४ हजार कोटी रुपयांची उलाढाल गेल्या सहा महिन्यात झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे पुढच्या सहा महिन्यात आणखी व्यवहार वाढेल असं जाणकारांचं म्हणणं आहे. करोना येण्यापूर्वी दक्षिण आणि मध्य मुंबईत एका अलिशान घराची किंमत १५ कोटींच्या वर होती.
“देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार होत असतात. जानेवारी ते जून दरम्यान १.२६ लाख युनिट विक्री झाल्याची नोंद झाली आहे. २०१९ आणि २०२० च्या तुलनेत ही मोठी उलाढाल आहे. मुद्रांक शुल्क कमी झाल्याने आणि शेअर बाजारातील उत्साहामुळे त्याचे परिणाम खरेदी विक्रीवर झाले आहेत.”, असं स्क्वेअर यार्डचे बिजनेस हेड आनंद मूर्ती यांनी सांगितलं आहे.
“आता मुंबईकर सविनय कायदेभंग करतील”, भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा!
आकडेवारीनुसार ४५ टक्के खरेदी केलेल्या घरांची किंमत १५ ते २० कोटींच्या घरात आहे. तर ४० टक्के खरेदी केलेल्या घरांची किंमत २० ते ३० कोटींच्या आसपास आहे. तर १० टक्क्यांहून कमी खरेदी केलेल्या घरांची किंमत ३० ते ५० कोटींजवळआहे. तर ७ टक्के घरांच्या किंमती या ५० कोटींपेक्षा अधिक आहेत. तर एकूण व्यवहारांपैकी ६० टक्के व्यवहार हे लोअर परळ भागातील आहेत. या भागातील ६० टक्के व्यवहारांवर २ टक्के मुद्रांक शुल्क नोंदवलं गेलं आहे. उच्चभ्रू इमारतीतील वरच्या मजल्यांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचं यातून दिसत आहे. ३४ टक्के लोकांनी ४० किंवा त्यावरील वरच्या मजल्यांना पसंती दिली आहे. एकूण विक्रीच्या ४३ टक्के वाटा हा ४ हजार ते ६ हजार स्क्वेअर फूटच्या मालमत्तांचा आहे. या यादीतील जवळपास ६७ टक्के खरेदीदारांचं वय हे ४० वर्षांपेक्षा अधिक आहे. तर ३५ टक्के खरेदीदार हे बांधकाम क्षेत्रातील आहे, असंही सांगण्यात आलं आहे.