मुंबई : उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेच्यावतीने मुंबई ते मडगाव विशेष रेल्वेगाड्या धावणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना उन्हाळी विशेष रेल्वेगाडीचा फायदा होणार आहे.

गाडी क्रमांक ०११०४/०११०३ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी धावेल. गाडी क्रमांक ०११०४ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ६ एप्रिल ते ४ मेपर्यंत दर रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून निघेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७ एप्रिल ते ५ मेपर्यंत दर सोमवारी सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे रात्री ९.४० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.

या रेल्वेगाडीला २० एलएचबी डबे असणार आहेत. द्वितीय श्रेणी वातानुकूलित १ डबा, तृतीय श्रेणी वातानुकूलित ३ डबे, शयनयान ८ डबे, सामान्य ४ डबे, तृतीय श्रेणी इकाॅनाॅमी २ डबे, जनरेटर कार १ डबा, एसएलआर १ डबा अशी रचना असेल. या दोन्ही रेल्वेगाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर, प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएस) २ एप्रिल रोजी सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.

ओडिशा, आसाम, मध्य प्रदेशसाठी विशेष रेल्वेगाड्या सुटणार

मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त १३२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून थेट ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश या राज्यात विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेने याआधी ८५४ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली होती. तर, आता अतिरिक्त १३२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण ९८६ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या धावतील. त्यात २७८ अनारक्षित रेल्वेगाड्या असणार आहेत. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण ३१ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.