मुंबई : होळीनिमित्त रेल्वेने कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई – मडगाव विशेष रेल्वेगाड्या, पनवेल-चिपळूण मेमू धावणार आहे.

गाडी क्रमांक ०११०२ आणि ०११०१ मडगाव – पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०११०२ मडगाव – पनवेल साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी मडगाववरून १५ आणि २२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी पनवेल येथे सायंकाळी ५.३० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०११०१ पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी पनवेलवरून १५ आणि २२ मार्च रोजी सायंकाळी ६.०२ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोहचेल. या रेल्वेगाडीला करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण स्थानकावर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील. द्वितीय श्रेणीचा वातानुकूलित एक डबा, तृतीय श्रेणीचे वातानुकूलित तीन डबे, तृतीय श्रेणीचे वातानुकूलित इकाॅनाॅमीचे दोन डबे, शयनयानचे आठ डबे, सामान्य चार डबे, जनरल कारचा एक डबा, एसएलआर एक डबा असेल.

गाडी क्रमांक ०११०४ / ०११०३ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०११०४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १६ आणि २३ मार्च रोजी मडगाव येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १७ आणि २४ मार्च रोजी सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. ही रेल्वेगाडी करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील. यात द्वितीय श्रेणीचा वातानुकूलित एक डबा, तृतीय श्रेणीचे वातानुकूलित तीन डबे, तृतीय श्रेणीचे वातानुकूलित इकाॅनाॅमीचे दोन डबे, शयनयानचे आठ डबे, सामान्य चार डबे, जनरल कारचा एक डबा, एसएलआर एक डबा असेल.

गाडी क्रमांक ०१०१८/ ०१०१७ चिपळूण – पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०१०१८ चिपळूण – पनवेल अनारक्षित मेमू विशेष गाडी १३ ते १६ मार्चपर्यंत चिपळूणहून दुपारी ३.२५ वाजता सुटेल. ही मेमू त्याच दिवशी रात्री ८.२० वाजता पनवेलला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०१७ पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष गाडी १३ ते १६ मार्चपर्यंत पनवेलहून रात्री ९.१० वाजता सुटेल. ही मेमू दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता चिपळूणला पोहोचेल. मेमू अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाण खावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण स्थानकावर थांबेल.

Story img Loader