धवल कुलकर्णी
मुंबईमध्ये कोरोनाव्हायरस चे थैमान सुरू आहे. अशात बृहन्मुंबई महानगरपालिकेने करोना संशयितांच्या नमुन्यांच्या चाचणी बाबतचे नियम बदलले आहेत. आता फक्त करोनाची लक्षणे (symptoms) लोकांमध्ये दिसतात त्यांची चाचणी केली जाईल. ज्या लोकांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नाहीत (asymptomatic) त्यांच्या नमुने चाचणीसाठी (टेस्टिंग) गोळा करण्यात येणार नाहीत. हे नियम मुंबई महानगरपालिका आणि इतर सरकारी व खासगी रुग्णालयं व चाचणी केंद्रांसाठी लागू असतील.
या नियमांप्रमाणे ज्या लोकांना करोनाची लक्षणे म्हणजेच ताप आणि खोकला जाणवतात, ६० वर्षांवरील High Risk Contacts आणि जे करोना चा संसर्ग झालेल्या यांच्या संपर्कात आले आहेत असे लोक अशी high risk मंडळी ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आहेत आणि करोना झालेल्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांची चाचणी होईल.
याचसोबत ३४ आठवडे भरलेल्या गरोदर महिला, डायलिसिस आणि केमोथेरेपीवर असलेले रुग्ण तसंच आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांचा COVID झालेल्या रुग्णांना सोबत संपर्क आला असल्यास आणि त्यांच्या लक्षणे दिसत नसल्यास त्यांचीही चाचणी करण्यात येईल.
जर कुणाला करोनाची लक्षणे दिसत नसतील तर अशा मंडळींना चाचणी न करता सुद्धा त्यांचे विलगीकरण करण्यात येईल. हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या मंडळींच्या घरी जर स्वच्छ टॉयलेट आणि खोलीची सोय असेल तर त्यांचे घरातच विलगीकरण करण्यात येईल. मात्र झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या high risk मंडळींना हॉस्पिटलसारख्या संस्थांमध्येच विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्व प्रभाग अधिकार्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला करोनाची लक्षणं जाणवत नाहीत तो पर्यंत त्यांची चाचणी करण्यात येऊ नये. ती व्यक्ती ती high risk असो वा low risk.
याबाबत संपर्क साधला असता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की हा निर्णय इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR च्या निर्देशाप्रमाणे घेण्यात आला. केंद्र सरकारच्या टीमने सुद्धा या संदर्भामध्ये अशा सूचना दिल्या. इतर राज्यात सुद्धा असेच सुरू आहे, असेही त्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र त्या अधिकाऱ्यांनी मान्य केले की आतापर्यंत आपण लक्षणं न दिसणाऱ्या लोकांची सुद्धा चाचणी करत होतो त्यामुळे त्यांच्यातले अनेक केसेस सुद्धा उघडकीला आले. आपल्याकडे असलेल्या टेस्टिंग किट्सचा पुरेपूर वापर करणे गरजेचे आहे. लक्षणे न दाखवणाऱ्या मंडळीवर आम्ही आमची साधनं वापरली तर लक्षणं असणाऱ्या लोकांचे काय? सध्या हाय रिस्क कॅटेगरीतलया लोकांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आम्ही ठरवले आहे. तसेच ज्या करोना संशयितांमध्ये लक्षणं दिसत नाहीत त्यांचेही क्वारंटाइन आणि आयोसोलेशन केले जाते आहे. विलगीकरणात असताना जर त्यांना कोणती लक्षणं आढळून आली तर त्यांची तपासणी केली जाईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
लक्षणं नसणाऱ्यांची चाचणी पूर्णपणे बंद होणार नाही
मात्र याबाबत बोलताना बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ज्या व्यक्तींमध्ये करोनाची कुठलीही चिन्हे अथवा लक्षणे आढळत नाहीत त्यांची चाचणी पहिल्या पाच दिवसांमध्ये केल्यास चुकीचा निकाल किंवा false निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेगळे कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात. अशा asymptomatic रुग्णांची चाचणी ही गरजेनुसार पाच ते १४ दिवसांमध्ये करण्यात येते.
आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने साधपरणपणे ३० हजार चाचण्या केल्या आहेत. यातून साधारणपणे १९३६ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशामध्ये अन्य ठिकाणी लॅब नसल्यामुळे त्या भागांमध्ये नमुने तपासण्याचे काम सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिका करते आहे.