Mahavikas Aghadi Mahamorcha: महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं गेलं. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. महामोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.

Live Updates

MVA Mahamorcha Live Updates, 17 December 2022 : मुंबईत 'महामोर्चा' विरुद्ध 'माफी मांगो आंदोलन'!

14:33 (IST) 17 Dec 2022
हा तर नॅनो मोर्चा, संख्येवरून लगेच कळतंय - देवंद्र फडणवीस

"मोर्चा तर लहानच झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून माणसं बोलवल्यानंतर परिस्थिती अशी हवी होती की कैक किलोमीटर लांब मोर्चा झाला. पूर्ण आझाद मैदान भरणारा मोर्चा असायला हवा होता. पण मोर्चा अपयशी ठरला हे संख्येवरून दिसतंय", अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर खोचक शब्दांत टीका केली.

14:22 (IST) 17 Dec 2022
“स्वत:ला बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे तोतये समजतात, पण…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा ह्या मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही चालणार का? मी एकटा नाही, तर माझ्याबरोबर लाखो महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. ज्यांनी ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे, असा एल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.

वाचा सविस्तर

14:11 (IST) 17 Dec 2022
राज्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा - शरद पवार

या राज्यकर्त्यांमध्ये कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू झाली आहे. एका मंत्र्याने उल्लेख केला की शिक्षणासाठी मदत मागितली तर त्याला भीक मागितली असं म्हणाले. तिथे महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख केला - शरद पवार

14:10 (IST) 17 Dec 2022
आज लोक शांत आहेत, पण राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर... - शरद पवार

आज लोक शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्याचं प्रतीक आज इथे दिसतंय - शरद पवार

14:09 (IST) 17 Dec 2022
...तर राज्यपाल म्हणून त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही - शरद पवार

महात्मा फुलेंनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. अशा व्यक्तीबाबत टिंगल-टवाळी राज्यपालांकडून होत असेल, तर राज्यपाल म्हणून त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही - शरद पवार

14:08 (IST) 17 Dec 2022
राज्यपालांना शरम वाटली पाहिजे - शरद पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात असा गव्हर्नर कधी पाहिला नाही. मी स्वत: राज्याच्या विधानभवनात जाऊन ५५ वर्षं झाली. या काळात मी अनेक राज्यपाल पाहिले. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचं काम यांनी केलं. पण यावेळी राज्याच्या विचारधारेला संकटात आणण्याचं काम होत आहे. महात्मा फुले, सावित्रीबाईंबद्दल लाजिरवाणे उद्गार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे - शरद पवार

14:04 (IST) 17 Dec 2022
या इशाऱ्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही, तर... - शरद पवार

या इशाऱ्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही, तर लोकशाहीच्या मैदानात त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, याबद्दलची खात्री मला आहे - शरद पवार

14:02 (IST) 17 Dec 2022

हे खरं आहे की आजचा मोर्चा एक वेगळी स्थिती दाखवतो. ७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर मुंबईत लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं, यासाठी हौतात्म्य पत्करायला अनेक तरुण पुढे आले. शेवटी महाराष्ट्र पदरात पडला. पण तरीही अजूनही महाराष्ट्रात बाहेरचे मराठी भाषिक येण्याचा आग्रह करत आहेत. बेळगाव, निपाणी, कारवार किंवा अन्य भागाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, यासाठी त्यांच्या भावनेशी राज्यातला मराठी माणूस सहभागी आहे - शरद पवार

13:57 (IST) 17 Dec 2022

एवढी ताकद एकवटल्यानंतर कुणाची काय ब्याद आहे की मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा लचका तोडणार - उद्धव ठाकरे

13:55 (IST) 17 Dec 2022
या गर्दीमुळे महाराष्ट्रद्रोह्यांचे डोळे उघडायला हवेत - उद्धव ठाकरे

या गर्दीमुळे महाराष्ट्रद्रोह्यांचे डोळे उघडले पाहिजेत. जर ते उघडणार नसतील, तर ते कधीच उघडू नयेत, अशी आपण प्रार्थना करुयात. जा, निघून जा इकडनं - उद्धव ठाकरे

13:54 (IST) 17 Dec 2022

तिसरे आपले मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांनी तर आग्र्याहून महाराजांची सुटका झाली, त्यांची बरोबरी या खोकेवाल्यांशी केली आहे. कुठे तुम्ही, कुठे शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आणि यांनी खोके घेऊन, लांडीलबाडी करून, पाठीत वार करून, तेही आपल्या राजकीय पक्षाच्या म्हणजे स्वत:च्या आईच्या पाठीत नव्हे, कुशीत वार करून सरकार स्थापन केलं, त्यांची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांशी करताय? - उद्धव ठाकरे

13:53 (IST) 17 Dec 2022

यांच्या मंत्रीमंडळात कसे मंत्री आहेत? एक तर बौद्धिक दारिद्र्य असणारे आहेत. दुसरे सुप्रिया सुळेंचा अपमान करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीये. हे लफंगे आहेत. महाराष्ट्र लुटायला आले आहेत. शिवाजी महाराजांनी मातेबद्दल, परस्त्रीबद्दल आदर कसा ठेवायचा याची शिकवण दिली आहे - उद्धव ठाकरे

13:52 (IST) 17 Dec 2022

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल हे बोलतायत. जर ते नसते, तर आज आपण कुठे असतो त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्यांनी 'भीक' शब्द वापरून दाखवून दिलं आहे. त्या लोकांनी तेव्हा शेणमार, धोंडमार सहन केली पण ते डगमगले नाही. त्यांच्यामुळे आपण शाळेत गेलो. आपण तसे गेलो नसतो, तर आपणही यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे. काही शब्दांता अर्थ असतो की नाही - उद्धव ठाकरे

13:50 (IST) 17 Dec 2022

मी तर त्यांना राज्यपालच मानत नाही. त्या पदाचा आम्ही नक्की मान राखतो. त्या पदावर कुणीही बसावं आणि कुणालाही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे राज्यपाल कोण असावा? फक्त केंद्रात जो बसतो, त्यांच्याघरी काम करणारा माणूस कुठेतरी सोय म्हणून पाठवायचा नसतो. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. त्यांनी त्यांच्यासारखं वागलं पाहिजे - उद्धव ठाकरे

13:49 (IST) 17 Dec 2022

बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो म्हणणारे तोतये... खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही आणि असं जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे - उद्धव ठाकरे

13:48 (IST) 17 Dec 2022

अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुणीही यायचं आणि डिवचून जायचं. आज सर्व पक्षांचे झेंडे इथे दिसतायत, ही महाराष्ट्राची ताकद आहे. फक्त महाराष्ट्रद्रोही इथे नाहीयेत - उद्धव ठाकरे

13:47 (IST) 17 Dec 2022
मला कुणीतरी विचारलं तुम्ही एवढं चालणार का, मी म्हटलं... - उद्धव ठाकरे

बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशानं पाहिला असेल. मोर्चाची घोषणा केली तेव्हा मला काहींनी विचारलं तुम्ही एवढे चालणार का? मी म्हटलं मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्रप्रेमी नुसतेच नाही, तर महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजवर आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्यानंतर असं दृश्य सगळ्या जगानं पहिल्यांदा पाहिलं असेल - उद्धव ठाकरे

13:44 (IST) 17 Dec 2022

आपल्याला एवढ्यावर थांबून चालणार नाही. आपण एकजूट दाखवून सरकारच्या चुकीच्या निर्णयांना थांबवण्यासाठी सरकारला त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण करायला हवं - अजित पवार

13:43 (IST) 17 Dec 2022

महाराष्ट्र सरकारने ७ डिसेंबरला कर्नाटक बँकेत खाती उघडण्याचा जीआर काढला आहे. त्यांना काही वाटायला हवं. तुमचं पुतना मावशीचं प्रेम सगळ्यांना कळालं आहे - अजित पवार

13:43 (IST) 17 Dec 2022

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? हे रान उठवण्याचं काम कुणी केलं? हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सहा महिन्यात महापुरुषांचा अवमान व्हायला लागलाय. महाराष्ट्रातील गावं शेजारी राज्यांत जाऊ असं म्हणायला लागली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वेगवेगळे दावे करायला लागले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कुणी ट्वीट केलं? हे समोर यायला हवं - अजित पवार

13:39 (IST) 17 Dec 2022

बेळगाव, निराणी, कारवारसह सीमाभागातील ८६५ मराठी गावं महाराष्ट्रात आणण्याचा संघर्ष सुरू असताना महाराष्ट्रातील गावं अचानक कर्नाटकमध्ये जाण्याचं का जाहीर करू लागले. याचं टूलकिट कुठून जारी झालं? याचा नागरिकांनी विचार करायला हवा. अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये काम केलं. पण कधी सीमाभागातील गावं असं म्हणत नव्हती. देशातल्या इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र वेगळा आहे. या मातीला शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा आहे - अजित पवार

13:38 (IST) 17 Dec 2022
याची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी कायदा आणा - अजित पवार

राज्यपालांना हटवलं पाहिजे. दोषी असणाऱ्या आमदारांना हटवलं पाहिजे. त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशी पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पावलं उचलायला हवीत. त्यासाठी कायदा केला तरी चालेल, विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देतील. - अजित पवार

13:37 (IST) 17 Dec 2022
यांना जनाची नाही, मनाची काही वाटायला पाहिजे - अजित पवार

माणसाची चूक एखाद्या वेळी होते. चूक झाल्यावर माफी मागणं ही आपली महाराष्ट्र संस्कृती आहे. मराठी माणसावर तसे संस्कार केले आहेत. पण तसं घडत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे दुसरे मंत्री बोलतायत. यांना जनाची नाही, मनाची काही वाटायला पाहिजे. तुम्ही राज्यपाल म्हणून बसलायत. पण याचा विसर राज्यकर्त्यांना पडलाय. - अजित पवार

13:36 (IST) 17 Dec 2022
कोण यामागचा मास्टरमाईंड आहे? का हे थांबत नाहीये - अजित पवार

ही वेळ का यावी? महापुरुषांच्या बाबतीत अपमानास्पद बोलणं सुरू आहे. त्याला विरोध केलंं पाहिजे. शिवाजी महाराज आपलं दैवत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक महापुरुषांची नावं आपल्याला घेता येतील. पण यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्याचं काम कशासाठी चाललंय? कोण यामागचा मास्टरमाईंड आहे? का हे थांबत नाहीये - अजित पवार

13:34 (IST) 17 Dec 2022

महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा शाप असला, तरी महाराष्ट्रावर संकट येतं तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उठतो. मग ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे. - अजित पवार

13:34 (IST) 17 Dec 2022
महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मोर्चा काढला - अजित पवार

महापुरुषांचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवण्यासाठी, महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी, त्यांच्या मनात धडकी भरवण्यासाठी आपण हा मोर्चा काढला आहे.

13:28 (IST) 17 Dec 2022
भाजपाचा खरा चेहरा समोर आला - नान पटोले

मागच्या आठवड्यात राज्यपाल पंतप्रधानांसोबत बसलेले आपण पाहिले. भाजपाचा खरा चेहरा समोर आला. भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं वक्तव्य केलं. त्यामुळे देशाच्या महापुरुषाचा अपमान करण्याचं धाडस भाजपानं केलं - नाना पटोले

13:27 (IST) 17 Dec 2022
राज्यपालांनी सुरुवात केली, चंद्रकांत पाटलांनी कळस गाठला - नाना पटोले

आज तिरंग्यात सगळा महाराष्ट्र एकत्र आलाय, हे चित्र आजच्या मोर्चात पाहायला मिळत आहे. राज्यपाल भवनातून महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान करण्याचं काम केलं गेलं. त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कळस गाठला. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांच्या अवमानाचं काम भाजपाकडून केलं गेलं. - नाना पटोले

13:22 (IST) 17 Dec 2022

या मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर कर्नाटकचा मुख्यमंत्री बोम्मईला आमच्या ताब्यात द्या. - संजय राऊत

13:21 (IST) 17 Dec 2022

समोर दिसणारा रावण गाडण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. रणनीती ठरली आहे. शंख फुंकलं आहे. आता फक्त ही फौज युद्धासाठी सज्ज करायचयी आहे. - संजय राऊत

mumbai mahamorcha

मुंबईत मविआचा महामोर्चा (फोटो - लोकसत्ता टीम)

MVA Mahamorcha Live Updates, 17 December 2022 : मुंबईत 'महामोर्चा' विरुद्ध 'माफी मांगो आंदोलन'!

 

Story img Loader