मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहीम स्थानकावरील दक्षिण पादचारी पूल (एफओबी) वरील दुरुस्तीचे काम सातत्याने सुरू असून ३० एप्रिल २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गंभीर संरचनात्मक समस्या आढळून आल्यानंतर दैनंदिन प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा दुवा असलेला हा पूल तातडीच्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. तपासणीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले होते. एकूण ४० मीटर लांबी आणि ४ मीटर रुंदी असलेला हा पूल माहीम स्थानकावरील दैनंदिन प्रवाशांच्या रहदारीसाठी महत्त्वाचा आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
आतापर्यंत खराब झालेले प्रीकास्ट आरसीसी स्लॅब पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत. २० मीटरच्या पट्ट्यावरील गंजलेले सपोर्ट बीम बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुरुस्तीच्या काळात दक्षिणेकडील पादचारी पूल प्रवाशांसाठी बंद राहील. मात्र, माहीम स्थानकाच्या उत्तरेकडील टोकाला असलेले दोन पर्यायी पादचारी पूल खुले आहेत. ज्यामुळे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडील प्रवास करता येईल. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.