मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकार्पण झालेल्या मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकरांच्या पसंतीस उतरत आहे. त्यानंतर मुंबईकरांनी या मार्गाला भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला. ३१ मार्च रोजी सार्वजनिक सुटीच्या निमित्ताने ऑनलाईन तिकिटाचे सर्व स्लॉट हाऊसफुल्ल झाले. तसेच येत्या आठवडाभराच्या कालावधीसाठीही नागरिकांनी आगाऊ तिकिट नोंदणी केली आहे. अवघ्या दोन दिवसात तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी निसर्ग उद्यान मार्गाला भेट दिली.

सिंगापूर येथील ‘ट्री टॉप वॉक’च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये खर्चून निसर्ग उन्नत मार्ग विकसित केला आहे. या मार्गाचे लोकार्पण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी पार पडल्यानंतर मार्ग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पहिल्या दिवशी म्हणजेच ३० मार्च रोजी १ हजार ५३ मुंबईकरांनी या मार्गाला भेट दिली. या तिकिट नोंदणीतून महापालिकेच्या तिजोरीत २६ हजार ९२५ रुपये इतका महसूल जमा झाला. तर ३१ मार्च रोजी २ हजार ३४६ पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली. यातून ६० हजार ३०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला. तसेच आठवड्याच्या अखेरसाठीही मोठ्या प्रमाणात आगाऊ तिकिट नोंदणी होत आहे.

शेकडो झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे. या ठिकाणी मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह झाडे, निरनिराळे पक्षी, सरपटणारे प्राणी न्याहाळताना एका ठिकाणावरून गिरगांव चौपटीेचेही विहंगम दृश्य पाहण्याचीही संधी पर्यटकांना मिळत आहे. तसेच, पर्यटकांना पूर्वपरवानगीशिवाय चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश

निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी-सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करावे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच पर्यावरणदृष्ट्या नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे, त्यामुळे या ठिकाणी परिरक्षणाच्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याच्याही सूचना गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

ऑनलाईन तिकिट नोंदणीची सुविधा

निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये, तर परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचा कालावधी (स्लॉट) आहे. तसेच ऑनलाईन तिकिट नोंदणीतून प्राप्त झालेल्या बारकोडच्या सहाय्यानेच पर्यटकांना या मार्गावर प्रवेश मिळणार आहे.