मुंबई : मालाडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा असा मीठ चौकी उड्डाणपूल रविवारपासून जनतेसाठी खुला करण्यात आला. बांधकाम पूर्ण झाल्यामुळे हा पूल उद्घाटन सोहळ्याशिवाय वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार पीयूष गोयल यांनी केली. रविवारी त्यांनी या पुलाची पाहणी केली व पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश दिले.
मुंबई महानगरपालिकेने मालाड पूर्व – पश्चिम परिसर जोडण्यासाठी मीठ चौकी पूल उभारला. मालाड पश्चिमेला असलेल्या मीठ चौकी जंक्शनवर टी आकाराच उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मार्वेकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे अर्थात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाता येणार आहे. मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी एक मार्गिका आणि मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी दुसरी मार्गिका अशी उड्डाणपुलाची रचना आहे. त्यापैकी मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी एकेरी मार्गिका ६ ऑक्टोबर २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. तर गोरेगावकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम उद्याप सुरू होते. ते कामही पूर्ण झाले असून पीयूष गोयल यांनी रविवारी या पुलाची पाहणी केली व पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची घोषणा केली.
हेही वाचा – मुंबई : तापमानात घट होण्याची शक्यता
हेही वाचा – आयआरसीटीसी संकेतस्थळ काही काळ बंद
उद्घाटन औपचारिक सोपस्कार करण्याऐवजी जनतेच्या सोयीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. या उड्डाणपुलामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल. तसेच वेळ आणि इंधनाची बचत होईल, असे गोयल म्हणाले.