मुंबई : आर्थिक गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवून मालाडमधील ६८ वर्षीय वयोवृद्धाला डिजिटल अटक करण्यात आल्याचे दाखवून त्याची लाखो रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. जय रसीकभाई मोराडीया(२१), धरम मुलुभाई गोहिल(२६), संदीप प्रतापभाई केवडीया(३०) व जय जितेंद्रभाई असोद्रिया(२२) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे असून ते आंतरराज्यीय टोळीशी संबंधीत असल्याचे पोलिसांनी सांगतले.
६८ वर्षाचे वयोवृद्ध तक्रादार मालाडमध्ये राहतात. २१ डिसेंबरला सकाळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करुन तो पोलीस असल्याचे सांगितले. तक्रारदारांसह त्यांच्या कुटुंबियांची माहिती काढून त्याने त्यांच्या आधारकार्डवरुन गोयल नावाच्या एका व्यक्तीने बँकेत एक खाते उघडले आहे. या बँक खात्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी तक्रारदारांनी ते गोयल नावाच्या कुठल्याही व्यक्तीला ओळखत नसून त्यांचा संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यांशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने त्यांना व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी त्यांना समोर एक पोलीसांच्या गणवेशात एक व्यक्ती त्यांच्याशी बोलत असल्याचे दिसून आले. त्यांना डिजीटल अटक केल्याचे सांगून त्यांना कोणाशी संपर्क साधता येणार नाही असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…गोरेगावमध्ये मध्यरात्री जंगलात आग
या संपूर्ण प्रकरणातून सुटका करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली. नाहीतर त्यांच्यावर त्यांच्या घरात येऊन अटकेची कारवाई करावी लागेल अशी धमकी दिली होती. या प्रकाराने ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपये नसून साडेआठ लाख रुपयेच असल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्यांना ही रक्कम हस्तांतरीत करण्यास सांगून एका बँक खात्याची माहिती दिली होती. कारवाईच्या भीतीने तक्रारदारांनी आरोपीने दिलेल्या बँक खात्यात आठ लाख साठ हजार रुपये हस्तांतरीत केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मालाड पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला. त्यावेळी आरोपी गुजरातमधील सूरतमध्ये असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारावर चौघांना अटक केली. आरोपींच्या नावाने बँक खाती उघडून त्याद्वारे फसवणूक करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.