सहा दिवसांपूर्वी गोवंडी परिसरातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी उत्तर प्रदेशातून एका व्यक्तीला अटक करून या मुलाची सुटका केली. दरम्यान, मूल होत नसल्यामुळे या मुलाचे अपहरण केल्याचे आरोपीने चौकशीत कबुल केले.
हेही वाचा >>> सुट्ट्या पैशांवरून खळखळ टाळण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी ऑनलाईन व्यवहार करावा, मुंबईकरांची वाढती मागणी
गोवंडीमधील रस्ता क्रमांक १५ येथे वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील दोन वर्षांचा मुलगा ३ मार्च रोजी घराबाहेर खेळत होता. त्यावेळी अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले. मुलगा सापडत नसल्याने त्याच्या आई, वडिलांनी याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली असता आरोपी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गेल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा >>> मुंबईच्या ९९ वर्ष जुन्या Gateway of India च्या भिंतीला तडे, पुरातत्व विभागाच्या अहवालामुळे चिंता!
आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ आरपीएफला याबाबत माहिती दिली. त्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी लखनऊ येथे जाऊन आरोपीला मुलासह ताब्यात घेतले. मलीकराम यादव (३४) असे या आरोपीचे नाव असून मूल होत नसल्याने आपण या मुलाचे अपहरण केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी यादवला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.