मुंबईतल्या सायन स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. शीतल माने या आणि त्यांचे पती अविनाश माने हे दोघंही मानखुर्दला जाण्यासाठी रविवारी रात्री ९.१५ च्या आसपास सायन स्टेशन या ठिकाणी पोहचले होते. त्या ठिकाणी फलाट क्रमांक १ वर शीतलला एका माणसाचा धक्का लागला. यामुळे चिडलेल्या शीतल माने यांनी त्या व्यक्तीला छत्रीने मारण्यास सुरुवात केली. तसंच शीतल यांचे पती अविनाश यांनीही त्याला जोरदार ठोसा लगावला. यामुळे हा माणूस रेल्वे रुळांवर पडला. त्याचवेळी ट्रेनने त्याला चिरडलं. या घटनेत या माणसाचा मृत्यू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणात सुरुवातीला दादर जीआरपीने अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र जीआरपी गुन्हे शाखेद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर हे समजलं की ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं नाव दिनेश राठोड असं होतं. मुंबईतल्या बेस्ट या बस कंपनीत तो काम करत होता. सायन स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं तेव्हा संपूर्ण घटना उघडकीस आली. त्यानंतर अविनाश माने आणि शीतल माने या दोघांनाही अटक करण्यात आली. या दोघांना आता दादर जीआरपीकडे सोपवण्यात आलं आहे. भारतीय दंड संहिता कलमम ३०४ (२) आणि कलम ३४ च्या अंतर्गत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतं आहे?

सीसीटीव्हीमध्ये एक माणूस दिसतो. त्या माणसाचा धक्का एका महिलेला लागतो. त्यानंतर ही महिला त्याला छत्रीने मारायला सुरुवात करते. त्यानंतर महिलेचा पती येतो तो या माणसाला जोरदार ठोसा मारतो. धक्का लागून हा माणूस रुळावर पडतो. त्याचवेळी ट्रॅकवरुन ट्रेन येते. माणूस कसाबसा उठून वर येण्याचा प्रयत्न करतो. मात्र ट्रेन वेगात असते जी त्याला चिरडून निघून जाते. त्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai man crushed under train fell on track after being hit horror on cctv scj