Nishant Tripathi Suicide Case: बंगळुरूमध्ये अतुल सुभाष यांनी काही महिन्यापूर्वी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. मागच्या आठवड्यात आग्रा येथे मानव शर्मा नावाच्या आयटी कर्मचाऱ्याने घटस्फोटाच्या क्लेशदायक प्रक्रियेला कंटाळून आत्महत्या केली होती. यानंतर आता मुंबईतूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या सहारा हॉटेलमध्ये ४१ वर्षीय निशांत त्रिपाठीने आत्महत्या केली आहे. सुसाइड नोटमध्ये त्यांनी पत्नी आणि मावशीला यासाठी जबाबदार धरले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी निशांत त्रिपाठी यांनी हॉटेलच्या दरवाजावर डू नॉट डिस्टर्बचा टॅग लावला होता. त्यानंतर कंपनीच्या संकेतस्थळावर त्यांनी सुसाईड नोट अपलोड केली.

पत्नी आणि मावशीवर केले आरोप

सदर घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी निशांत त्रिपाठी यांची पत्नी अपूर्वा पारीख आणि मावशी प्रार्थना मिश्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. आत्महत्या करण्याच्या तीन दिवस आधी निशांत त्रिपाठी मुंबईच्या सहारा हॉटेलमध्ये थांबले होते. २८ फेब्रुवारी रोजी हॉटेलच्या बाथरुममध्ये त्यांनी गळफास लावून घेतला. त्याआधी त्यांनी दरवाजाला डू नॉट डिस्टर्बचा टॅग लावला होता.

त्रिपाठी यांनी बराच वेळ दरवाजा उघडला नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडी चावीने दरवाजा उघडला. आत जाऊन पाहिल्यानंतर निशांत मृतावस्थेत आढळून आले. यानंतर विमानतळ पोलिसांना तात्काळ याची सूचना देण्यात आली. पोलिसांनी पार्थिव ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. तपासादरम्यान पोलिसांना त्रिपाठी यांनी कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड केलेली सुसाईड नोट सापडली.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?

निशांत त्रिपाठी यांनी पत्नीवर आरोप करत असताना तिच्याबद्दल प्रेमही व्यक्त केले. त्यांनी लिहिले, “हाय बेब, तू जेव्हा हे पत्र वाचशील, तोपर्यंत मी या जगात नसेन. तुझ्याबरोबर जे काही झाले, त्याबद्दल मी तुझा द्वेष करू शकतो. पण मला असे करायचे नाही. मी यावेळी प्रेम निवडतो. मी तेव्हाही तुझ्याशी प्रेम करत होतो, करत आहे आणि पुढेही करत राहिल.” तसेच निशांत त्रिपाठी यांनी पुढे लिहिले, “मी ज्या संकटाचा सामना केला, त्याबद्दल माझ्या आईला कल्पना आहे. तू आणि प्रार्थना मावशी माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहात. यासाठी आता तुम्हाला विनंती करतो की, माझ्या आईपासून दूर रहा. ती आधीच खूप दुःखी आहे. तिला शांततेत राहू द्या.”

Story img Loader