मुंबई : पवई येथे शंभर रूपयांवरून झालेल्या वादातून ४५ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर कटरने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराने आपल्याकडून शंभर रुपये घेतल्याचा दावा आरोपीकडून करण्यात आला. पण तक्रारदाराने पैसे घेतले नसल्याचे सांगताच आरोपी संतापला. त्यातून त्याने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार रामबहुदूर बहादुरसाही (४५) असे जखमी व्यक्तीचे नाव असून ते पवईतील मिलिंद नगर परिसरात राहतात. आरोपी दिलीप आव्हाड (४२) त्याच परिसरात वास्तव्यास आहे. आव्हाडने मंगळवारी सायंकाळी रामबहादूरकडे काही दिवसांपूर्वी घेतलेले शंभर रुपये मागितले. रामबहादुरने सुरूवातीला दुर्लक्ष केले. पण त्यानंतर आव्हाडने त्याच्यासोबत पैशांवरून वाद घालण्यास सुरूवात केली. तुझ्याकडून पैसे घेतले नाही, तर देण्याचा प्रश्नच नाही, असे रामबहादुरने सांगितले. त्यामुळे संतापलेल्या आव्हाडने रामबहादूरला मारहाण करण्यास सुरूवात केली. रामबहादूरनेही प्रतिकार केला. त्यावेळी आव्हाडने रागाच्या भरात धारदार कटरने रामबहादूरच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या राम बहादूरला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी राम बहादूरवर उपचार केले. तसेच पोलिसांना याबबातची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ याबाबत रामबहादूरचा जबाब नोंदवला. त्याने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी आव्हाड विरोधात हत्येचा प्रयत्न व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस पथकाला आरोपी राहत असलेल्या मिलिंद नगर परिसरात पाठवण्यात आले. तेथील पथकाने परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. गुन्ह्यांत त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पवई पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा…मुंबई : निवडणुकीच्या कामावरून शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर

दिलीप रामभाऊ आव्हाड (४२) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी हाऊस किपिंगची कामे करतो. आरोपी आणि तक्रारदार एकाच परिसरात राहतात. त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते, असे पोलिसांनी सांगितले. रामबहादूरने काही दिवसांपूर्वी आपल्याकडून १०० रुपये घेतले होते. ते परत केले नाहीत. त्या रागातून रामबहादूरवर हल्ला केल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. मात्र आपण अशी कोणतीही रक्कम घेतली नसल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. रामबहादूरची स्थिती गंभीर आहे. त्याच्या गळ्याभोवती झालेली जखम गंभीर आहे. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर अद्याप जप्त करण्यात आले नसून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीला बुधवारी न्यायालायपुढे हजर करण्यात आले.