मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. लोकल ट्रेनमध्ये वाढतच जाणाऱ्या गर्दीवर तोडगा काढण्याची मागणी केली जात असली, तरी अद्याप त्यावर तोडगा काढता आलेला नसून त्यामुळे अशा अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्थानकावर मंगळवारी अशाच प्रकारची एक घटना घडली. गर्दीमुळे चालत्या ट्रेनमधून माय-लेक बाहेर फेकले गेले. आरपीएफच्या जवानांमुळे या दोघांचे प्राण वाचले. CCTV मध्ये हा सगळा थरार कैद झाला आहे.
नेमकं घडलं काय?
हा सगळा प्रकार मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज एएनआयनं ट्वीट केलं असून त्यामध्ये आधी लहान मुलगा आणि नंतर ती महिलाही लोकल ट्रेनमधून बाहेर पडल्याचं दिसत आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकावर आलेल्या ट्रेनमध्ये ही महिला आधी तिच्या लहान मुलासह चढली. ट्रेन सुरूदेखील झाली. मात्र, ट्रेनमध्ये तोबा गर्दी असल्यामुळे तो मुलगा चालत्या ट्रेनमधून खाली पडला.
हा प्रकार लक्षात येताच प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरपीएफच्या जवानाने तातडीने या मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्या मुलाला जवानाने वाचवताच पुढे गेलेल्या डब्यातून ती महिलाही खाली पडली. पण तिथे दुसऱ्या जवानाने महिलेला मदतीचा हात दिला आणि तिचे प्राण वाचवले.
प्लॅटफॉर्मवरील इतर प्रवाशांना हा प्रकार पाहून धक्का बसला. मात्र, आरपीएफच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवून या दोघांचे प्राण वाचवल्यामुळे त्यांचं इतर प्रवासी कौतुक करत होते.