मुंबई : कडाक्याच्या थंडीला जिद्दीची जोड आणि ‘हर दिल मुंबई’चा नारा देत हजारो मुंबईकर तसेच जगभरातील धावपटू ‘टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला तोडीस तोड ज्येष्ठ नागरिकांची जिद्दही मुंबईच्या रस्त्यांवर नागरिकांनी अनुभवली. मुंबई मॅरेथॉनसाठी देशासह जगभरातील धावपटू शनिवारीच मुंबईत दाखल झाले. काहीजण हॉटेलमध्ये राहिले. तर काहींनी मुंबईतील नातेवाईकांकडे वास्तव्य केले. मात्र गुजरातमधील सुरत येथून रेल्वेने ७६ वर्षीय नरेश तालिया हे आजोबा शनिवारी सायंकाळच्या सुमारास एकटेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचले, रात्री रेल्वे स्थानकावरच झोपले आणि सकाळी ७.३५ वाजता मॅरेथॉनमध्ये धावायला सुरुवात करून यशस्वीरीत्या मॅरेथॉन पूर्ण केली.
गुजरातमधील सुरत येथून आलेले तालिया हे ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ या स्पर्धेच्या ज्येष्ठ नागरिकांच्या गटात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मेट्रो सिनेमा या मार्गावरची ४.२ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करून त्यांनी समाप्त रेषेजवळ योगासने केली. वयाच्या ७६ व्या वर्षी तालिया यांनी केलेले निरलंब शिर्षासन, हनुमानासन पाहून अनेकजण थक्क झाले. त्यांनी परिधान केलेला तिरंग्याचा पोशाखही सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.
हेही वाचा : ‘बीवी सताए, हमें बताएं’, मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या समर्थनार्थ समूहाकडून अनोखी जनजागृती
‘मला शाळेत असल्यापासूनच व्यायाम व योगासने करण्याची आवड आहे. मी १९८४ पासून गुजरातमधील विविध शहरातील तसेच इतर राज्यातील मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असून आजतागायत १०० हून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये मी धावलो आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये सर्वप्रथम २००५ साली ४२ किलोमीटरच्या गटात सहभागी झालो होतो. एखाद दुसऱ्या वर्षाचा अपवाद वगळता मी सातत्याने मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत आहे. युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे आणि चांगला आहार करून आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. दररोज काही वेळ व्यायाम केला पाहिजे. मी योग प्रशिक्षण व वजन कमी करण्याबाबत मार्गदर्शनही करतो’, असे तालिया यांनी सांगितले. तसेच मुंबईत कुठेही वास्तव्यास नसल्यामुळे मॅरेथॉन संपल्यावर मुंबई दर्शन करून पुन्हा रेल्वेने सुरतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.