मुंबई : श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा विशाल सोहळा अनुभवण्यासाठी प्रयागराजमधील ‘महाकुंभ’ मेळ्याला कोट्यवधी नागरिकांनी हजेरी लावली आहे. भारतीयांसह परदेशी नागरिकांची पावलेही महाकुंभ मेळ्याकडे वळली आहेत. मुंबई मॅरेथॉनमध्येही कुंभमेळ्यात सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धकांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर शारीरिकरित्या सुदृढ राहण्यासह मानसिक आरोग्य जपण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या ध्यानधारणा करणे आवश्यक असल्याचे म्हणत कांदिवली येथे राहणाऱ्या सुप्रिया गुरूंग यांनी ‘चलो कुंभ चले’ असे मुंबई मॅरेथॉनमधून आवाहन केले.
हेही वाचा – एटीएममधून रोकड काढणाऱ्या नागरिकांना लुटणारे परराज्यातील चोरटे गजाआड
मुंबईकरांना सुदृढ राहण्याच्या मार्गावर नेणारी आणि जगभरातील धावपटूंना आकर्षित करणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५’ ही स्पर्धा रविवार, १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ५.९ किलोमीटरच्या ‘ड्रीम रन’ या गटातून मुंबईकरांनी धावत विविध संदेश देण्याचाही प्रयत्न केला. ‘ड्रीम रन’ या गटातून धावताना कांदिवलीतील सुप्रिया गुरुंग यांनी ‘चलो कुंभ चले’ असा संदेश दिला. तसेच महाकुंभ मेळ्यात सहभागी होऊन स्नान व ध्यानधारणाद्वारे मानसिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीने महत्वाची असणारी मनःशांती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गुरुंग यांनी परिधान केलेला भगवा पोशाख आणि हाती घेतलेला फलक लक्षवेधी ठरला. तसेच यावेळी त्यांच्यासोबत हितेश परमार यांनी सुद्धा भगवा पोशाख परिधान करून ‘चलो कुंभ चले’ असे आवाहन केले आणि विलक्षण अनुभव देणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे सांगितले.
हेही वाचा – पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन जागृतीसाठी ३५ हजार सायकलपटूंची रॅली
‘आयुष्यात शारीरिकरित्या सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे, या गोष्टीची करोनाकाळानंतर प्रकर्षाने जाणीव झाली. त्यामुळे मी गेल्या तीन वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे. आपण शारीरिकरित्या सुदृढ राहण्यावर भर देत असताना आध्यात्मिक मार्गाने ध्यानधारणा करून मानसिक आरोग्य जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या ‘महाकुंभ’ मेळ्यात वैश्विक ऊर्जा निर्माण झाली आहे, त्यामुळे ‘महाकुंभ’ मेळ्यात सहभागी होऊन पवित्र गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीच्या संगमामध्ये स्नान करावे. त्याठिकाणी ध्यानधारणाही करावी. त्यामुळे तुमच्या मनाला निश्चितच शांतता व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये भगवा पोशाख परिधान करून ‘चलो कुंभ चले’ असा संदेश दिला. मी स्वतः महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहे’, असे सुप्रिया गुरूंग यांनी सांगितले.