मुंबई : थंडीच्या हंगामाची आता अखेर झाली असून मुंबईकरांना आता तप्त उन्हाळ्यासाठी तयार राहावे लागणार आहे.यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) मुंबईत कमाल किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक असेल. अशा स्थितीत तप्त उन्हाळ्याचा मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे. मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासूनच नागरिकांना उकाड्याचा आणि उन्हाच्या तड्याख्याचा सामना करावा लागला. कमाल तापमानाने सरासरी ओलांडली होती. काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटांचाही इशारा मुंबईला देण्यात आला होता. मागील तीन – चार दिवसांत उष्ण व दमट हवामानामुळे मुंबईकर हवालदिल झाले होते. आता पुन्हा मार्च महिन्यात नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. यावेळी उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली असली तरी अधूनमधून काही अंशांनी वाढ होईल. उष्ण व दमट हवामान असेल. यामुळे उकाडा सहन करावा लागेल. याचबरोबर काही वेळेस ढगाळ वातावरणाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाच्या पाऱ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईकरांना मार्च महिना उष्णतेचा ठरणार आहे.

फेब्रुवारीमध्ये साधारणपणे मुंबईचे सर्वाधिक कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचते. फेब्रुवारीच्या मध्यानंतर तापमान वाढ व्हायला सुरुवात होते. फेब्रुवारीचा दुसरा पंधरवडा आणि मार्चचे पहिले काही दिवस तापमानामध्ये चढ-उतार होत राहतात. एकाएकी तापमानाचा पारा वर चढतो, मात्र त्यानंतर तापमान चढेच राहील, असे नसते. ते थोडे खालीही उतरते. मात्र हिवाळ्यासारखा दिलासा आता अनुभवता येणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. मुंबईला समुद्रकिनारपट्टी लाभल्याने हा पारा सतत चढता नसतो. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानामध्ये घटही होते. प्रशांत महासागरात सध्या सक्रिय असलेला ला निना कमकुवत आहे. तो आणखी कमकुवत होताना दिसत आहे. एप्रिलअखेर ला निना निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे र्नैऋत्य मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरात कोणतीही स्थिती नसेल, याचा पावसाळ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

२० ते २८ फेब्रुवारीदरम्यान नोंदले गेलेले तापमान

२८ फेब्रुवारी – ३५.३ अंश सेल्सिअस

२७ फेब्रुवारी – ३८.४ अंश सेल्सिअस

२६ फेब्रुवारी – ३८.५ अंश सेल्सिअस

२५ फेब्रुवारी – ३८.७ अंश सेल्सिअस

२४ फेब्रुवारी – ३८.४ अंश सेल्सिअस

२३ फेब्रुवारी – ३७.२ अंश सेल्सिअस

२२ फेब्रुवारी – ३७.२ अंश सेल्सिअस

२१ फेब्रुवारी – ३७.३ अंश‌ सेल्सिअस

२० फेब्रुवारी – ३६.३ अंश सेल्सिअस

Story img Loader