गतवर्षीच्या तुलनेत २.१० लाख दशलक्ष लिटर पाण्याची तूट; भविष्यातील नियोजनासाठी पाणीकपातीची शक्यता

मुंबई : वर्षभर मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात तलावांमध्ये आजघडीला ३१७ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये तब्बल २ लाख १० हजार दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न पालिकेच्या जल विभागाला पडला आहे.

मुंबईकरांना उच्चतर वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणा या सात तलावांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. पालिका रोज या तलावांमधील ३,८०० दशलक्ष लिटर पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणते. पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर ३,६५० दशलक्ष लिटर पाणी घराघरांत पोहोचविले जाते.

वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र यंदा ऑगस्टमध्ये अधूनमधून पडलेला पाऊस आणि कोरडा गेलेला सप्टेंबर यामुळे तलावांतील साठय़ामध्ये तूट निर्माण झाली आहे. ही तूट दिवसेंदिवस वाढत असून त्यामागील कारण मात्र पालिकेला सापडलेले नाही.

सातही तलावांमध्ये २४ ऑक्टोबर २०१७ मध्ये १४ लाख १८ हजार ८७२ दशलक्ष लिटर पाणी साठा होता. मात्र २४ ऑक्टोबर २०१८ रोजी तलावांमध्ये १२ लाख सात हजार ३९६ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तलावांमध्ये तब्बल दोन लाख १० हजार दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. कपातीविना दररोज ३६५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला तर आजघडीला तालावात असलेले १२ लाख सात हजार ३९६ दशलक्ष लिटर पाणी ३१७ दिवस पुरेल.

त्यामुळे पुढच्या ४५ दिवसांच्या पाण्याचा प्रश्न आहे. तलावातील उपलब्ध जलसाठा मुंबईकरांना वर्षभर पुरावा यादृष्टीने महापालिकेने नियोजन केले नाही, तर

पाण्यासाठी वणवण करावी लागेल. मुंबईकरांना पाणी संकट भेडसावू नये यासाठी लवकरच जल विभागाकडून पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्याचा विचार सुरू आहे.

२४ ऑक्टोबर रोजी तलावांत उपलब्ध जलसाठा

तलावाचे नाव               २०१७                २०१८

                         (दशलक्ष लिटर)         (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा           २,२७,०४७             २,१६,४३९

मोडक सागर            १,२०,३५६              ९६,८९५

तानसा                     १,४१,४१६              १,२०,३५५

विहार                       २६,४५६                  २२,८७४

तुळसी                       ७,६३४                   ६,९६५

भातसा                        ७,०२,२२२            ६,०२,९०२

मध्य वैतरणा             १,९३,७४१             १,४०,९६६

एकूण                        १४,१८,८७२           १२,०७,३९६