स्वाइन फ्लू हा हृदयविकार आहे, असे म्हणणाऱ्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आता नवा जावईशोध लावला आहे. स्वाइन फ्लू हा श्वसनाचा आजार असल्याचे वक्तव्य महापौरांनी एका जाहीर कार्यक्रमात केले आणि हे वक्तव्य ऐकून उपस्थित श्रोतृवर्ग थक्कच झाला.
स्वाइन फ्लू हा विषाणूंमुळे पसरत असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर तपासून पाहा. स्वाइन फ्लू हा हृदयविकार आहे, असे स्नेहल आंबेकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मंथन आर्ट फाऊंडेशनतर्फे प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘डूडल सोशल अ‍ॅड फेस्टिव्हल २०१५’च्या उद्घाटन सोहळ्यास स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या.
फेस्टिव्हलच्या उद्घाटनानंतर स्नेहल आंबेकर यांनी आपल्या भाषणात स्वाइन फ्लूवरून पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले.
स्वाइन फ्लू हा श्वसनाचा आजार आहे. श्वासोच्छवासातून हा आजार पसरतो, असे मला सांगायचे होते. पण गुरुवारी पत्रकारांबरोबर बोलताना गोंधळ उडाला आणि फुप्फुसाऐवजी हृदयविकार असा उल्लेख माझ्याकडून अनवधानाने झाला. पत्रकारांनीही ‘हृदयविकार’ एवढाच शब्द पकडला आणि पराचा कावळा केला, असे स्पष्टीकरण देत स्नेहल आंबेकर यांनी आणखी जावईशोध लावला.