देशातला तसंच राज्यातला करोना प्रादुर्भावही सध्या वेगाने वाढताना दिसत आहे. अशातच सर्वांनी करोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. शासनाकडूनही याबद्दल वारंवार आवाहन केलं जात आहे, जनजागृती केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना डिझायनर मास्क परिधान न करण्याची सूचना केली होती. त्याऐवजी N-95 मास्क वापरण्याचं आवाहन पवार यांनी केलं होतं. यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतल्या करोना परिस्थितीसंदर्भात आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर माध्यमांशी संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या डिझायनर मास्क न घालण्याच्या सूचनेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर पेडणेकर म्हणाल्या, “माझा मास्क तीन लेअर असलेला आहे आणि श्वसनाला मला हे योग्य वाटतं. आणि मी एक महिला आहे. वय वाढलं तरी सौंदर्य किंवा छान राहणं हे गैर नाही. मास्क तर लावायचाच आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हणू दे. माझा पण तीन लेअरचा मास्क असतो कॉटनचा असून. तो धुतला जातो, पुन्हा वापरला जातो.त्यामुळे अजित पवार यांनी जे सांगितलं की N-95 लावा. आपण त्यात थोडा बदल करू. N-95 मास्क थोडा महाग आहे. सामान्यातल्या सामान्य जनतेचं मी नेतृत्व करते. मग माझ्या सामान्य जनतेला काय परवडेल याचं मी जर उदाहरण राहिले तर लोक ते करतील. आणि महिला असल्यामुळे एक सुप्त गुण असतो की सगळंच मॅचिंग हवं. पण माझं संरक्षण होतंय ना, मग मी वापरते”.
जाणून घ्या मुंबईतल्या करोना परिस्थितीविषयी…
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. मुंबईत काल एका दिवसात रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार केला आहे. मुंबईत काल (गुरुवारी) २०,१८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर यापैकी १,१७० रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. मुंबईत दिवसभरात करोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच धारावीत काल दिवसभरात तब्बल १०७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आकडेवारीपेक्षा सध्याची अधिक आकडेवारी चिंतेत भर घालणारी आहे.