मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कमध्ये केलेल्या भाषणाची आज चांगलीच चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. दोन वर्षापासून भाषण केलेलं नाही, मोरीत खूप तुंबलंय. बरंच काही बोलायचंय, असं भाषणाची सुरुवात करताना राज ठाकरे म्हणाले होते. याच मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.
किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, “आम्हाला वाटलं दोन वर्षाची मोरी तुंबलीय. त्या मोरीतून काही तरी निघेल. पण त्यातून काही निघालं नाही. त्या तुंबलेल्या मोरीतून भाजपाचे गांडूळ निघाले. अशा गांडुळांना पोसण्याचं काम लोकांनी करू नये. काल बोलताना ते म्हणाले, की मला कडेवर घ्या ना, मला कडेवर घ्या ना, खरं तर ते आमच्यासाठी नव्हतं. हा त्यांचाच स्वतःसाठी प्रयत्न होता,” अशी जोरदार टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
“गगनाला भिडलेल्या महागाईबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्याप्रती असलेल्या द्वेषातून राज ठाकरेंनी हा पक्ष स्थापन केला काय?, असा सवाल उपस्थित होतो. बाळासाहेबांनी अनेकांना घडवलं, त्यात राज ठाकरेही घडले पण ते असे का बिघडले, हेच कळेना,” असं टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.