‘दहिसर – अंधेरी २ अ’ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्या सोमवारी २.५ लाखापार पोहोचली. त्यामुळे या दोन्ही मार्गिकांनी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील मेट्रो ‘२ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये, तर दुसरा टप्पा १९ जानेवारी २०२३ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला.
पहिल्या टप्प्यात या मार्गिकेवरून दिवसाला सरासरी ३० हजार ५०० प्रवासी प्रवास करीत होते. मात्र दुसऱ्या टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या दोन्ही मार्गिकांवर पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झाली. त्यानंतर प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. जानेवारी २०२३ मध्ये प्रवासी संख्या प्रतिदिन ३० हजार ५०० इतकी होती. ती थेट प्रतिदिन १ लाख ६० हजारांवर पोहोचली. जूनच्या अखेरीस दैनंदिन प्रवासी संख्येने दोन लाखांचा टप्पा पार केला. तर आता ऑक्टोबर अखेरीस, सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी दैनंदिन प्रवासी संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात येत आहेत. त्यामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र मेट्रो प्रवाशांच्या मदतीला धावून आली आहे. त्यामुळे ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत झाल्याचे म्हटले जात आहे.