मुंबई: कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या अशा रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तेव्हा आता भुयारी मेट्रो सेवेत दाखल करण्यासाठीच्या अंतिम चाचणीला अर्थात मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे. सीएमआरएसच्या चाचण्यांच्या अनुषंगाने सध्या मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) अंतर्गत चाचण्या सुरु आहेत.

एमएमआरसीकडून ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो ३ चे काम सुरु आहे. तर ही मार्गिका आता तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. आरे ते बीकेसी, बीकेसी ते वरळी आणि वरळी ते कुलाबा अशा तीन टप्प्यात ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल. दरम्यान पहिल्या टप्प्यातील अर्थात आरे ते बीकेसीदरम्याने बांधकाम पूर्ण झाले आहे. हा टप्पा शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आता एमएमआरसीने हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने अंतिम चाचण्यांना वेग दिला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात आरडीएसओचे पथक मुंबईत दाखल झाले आणि त्यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील मार्गिकेदरम्यान चाचण्या सुरु झाल्या. आता या चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीतील सूत्रांनी दिली.

हेही वाचा : कोकण रेल्वे पनवेलपर्यंतच! पुढील एक महिना काही गाड्या एलटीटीऐवजी पनवेलपर्यंतच धावणार

आरडीएसओच्या चाचण्या पूर्ण झाल्याने आता अंतिम चाचणीला अर्थात सीएमएसआर चाचणी घेण्याच्याअनुषंगाने एमएमआरसीने तयारी सुरु केली आहे. सध्या सीएमएसआरच्या चाचण्यांच्यादृष्टीने एमएमआरसीकडून अंतर्गत चाचण्या सुरु आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्या की तात्काळ सीएमआरसीच्या पथकाला बोलविण्यात येणार आहे. ही चाचणी झाली आणि आरडीएसओसह सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले की मेट्रो ३चा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल असेही सुत्रांनी सांगितले. मात्र नेमकी भुयारी मेट्रो केव्हा धावणार याची निश्चित तारीख मात्र एमएसआरडीसीकडून सांगितली जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान याआधी पहिल्या टप्प्यासाठी अनेक तारखा देण्यात आल्या असून आता आॅगस्ट अखेरीस वा सप्टेंबरमध्ये पहिला टप्पा सेवेत दाखल होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.