Mumbai Metro 3 Aarey BKC Ticket Rates : वांद्रे कुर्ला संकुल ते आरेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी अवघ्या अर्ध्या तासात बीकेसी-आरे असा प्रवास करू शकतील. तसेच त्यांना या प्रवासासाठी केवळ ५० रुपये मोजावे लागणार आहेत. कारण मुंबईकरांच्या बहुप्रतीक्षित भुयारी मेट्रो लाइन ३ चा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. आरे ते बीकेसी प्रवास करण्यासाठी मुंबईकर सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गाचा वापर करतात. मात्र या मार्गावर सकाळी व सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी असते. त्यामुळे मुंबईकरांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. मात्र आता आरे – बीकेसी मेट्रो सुरू होणार असून गर्दीच्या वेळेत तर सहा ते सात मिनिटांनी या मार्गावर मेट्रो चालवली जाईल.
मुंबई मेट्रो ३ चा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या मेट्रोचं बांधकाम व देखरेख करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी या वृत्ताची पुष्टी केली असून दी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तिकीट दर किती?
मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्यात एकूण १० स्थानकांचा समावेश असून या १२.५ किमीच्या मार्गिकेदरम्यान अर्थात आरे – बीकेसीदरम्यान दररोज मेट्रोच्या ९६ फेऱ्या चालवल्या जातील. दर साडेसहा मिनिटाला या मार्गिकेवर मेट्रो चालवली जाईल. या मेट्रोचा पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या मार्गिकेवरून दिवसाला साडेचार लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा एमएमआरसीने व्यक्त केली आहे. या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १० ते ५० रुपयांपर्यंतचे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेट्रोच्या उद्धाटनासाठी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मोदी मुंबई मेट्रो ३ ला हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताची पुष्टी केलेली नाही.
हे ही वाचा >> ‘नरिमन पॉइंट’ची फेररचना; जल पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘मरिना प्रकल्प’
बांधकाम पूर्ण, आता केवळ प्रमाणपत्राची प्रतीक्षा
३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेतील १२.५ किमीच्या आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचवेळी मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक असे सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे प्रमाणपत्र येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून आरे – बीकेसी मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दरम्यान, मंगळवारी या मेट्रोची चाचणी देखील पूर्ण करण्यात आली आहे.
हे ही वाचा : मुंबई: दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत भुयारी मेट्रो ३ ची सेवा
एमएमआरसीच्या वेळापत्रकानुसार आरे – बीकेसी दरम्यान सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत मेट्रो ३ ची सेवा सुरू असणार आहे. तर रविवार सकाळी ८.३० ते रात्री १०.३० दरम्यान मेट्रो ३ ची सेवा पहिल्या टप्प्यादरम्यान सुरू राहणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.