मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत कधी दाखल होईल याची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. असे असताना पहिला टप्पा मात्र रखडलाच आहे. मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यातच काही मेट्रो स्थानकांना अद्याप अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. तर टप्पा ६ मधील काही स्थानकांची कामे अपूर्ण आहेत. एकूणच ही सर्व रखडलेली कामे पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे. परिणामी, मुंबईकरांची भुयारी मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा लांबली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’चे काम करीत आहे. यापैकी आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा शक्य तितक्या लवकरच वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. यासाठी अनेक तारखा देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही पहिला टप्पा रखडलाच आहे. आता विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याआधी पहिला टप्पा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न एमएमआरसीचा आहे. पण अद्यापही अनेक कामे पूर्ण झालेली नाहीत. या कामांच्या पूर्ततेसाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा एमएमआरसीकडून केला जात असला तरी आता टप्पा ६ मधील काही स्थानकांची कामे अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. जे. कुमार या कंत्राटदाराकडे टप्पा ६ चे काम असून या टप्प्यातील काही मेट्रो स्थानकांची कामे सुरू आहेत. लवकरच ती पूर्ण होतील, अशी माहिती एमएमआरसीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, विलंबाबाबत नुकताच जे. कुमारला दंडही ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबई : रस्त्याची कामे चार टक्के अधिक दराने, प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा; ६४ कोटींचा अधिकचा भुर्दंड

आचारसंहितेचे कारण

– काही मेट्रो स्थानकांची कामे अपूर्ण असतानाच पहिल्या टप्प्यातील काही मेट्रो स्थानकांसाठी अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळणेही शिल्लक आहे. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो संचलनासाठी सीएमआरएस प्रमाणपत्र बंधनकारक आहे. या प्रमाणपत्राशिवाय मेट्रो सुरूच करता येत नाही. असे असताना मागील महिन्याभरापासून सीएमआरएस प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत सीएमआरएस प्रमाणपत्र नसल्याने आरे-वांद्रे-कुर्ला संकुल टप्प्याला विलंब होत असल्याचे म्हटले जात होते.

हेही वाचा – पाच वर्षांत ‘लोकलेखा’चा एकच अहवाल!

– स्थानकांची कामे अपूर्ण असल्याने आणि काही स्थानकांना अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न मिळाल्याने सीएमआरएस प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया रखडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आचारसंहितेआधी आता ही रखडलेली कामे पूर्ण करून पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचे एमएमआरसीकडून सांगितले जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro 3 stalled awaiting no objection certificate from cmrs fire brigade phase 6 works are also incomplete mumbai print news ssb