Mumbai Metro 7 A : मेट्रो ७ ए च्या बांधकामासाठी बोगद्याचे काम सुरू असताना अंधेरी पूर्व येथील सहार रोड येथील पी अँड टी कॉलनीमध्ये शुक्रवारी रस्त्याचा मोठा भाग अचानक खचला. तेथे राहणाऱ्या नागरिकांसाठी हा खचलेला रस्ता धोकादायक असल्याने ठेकेदाराने येथील ९ कुटुंबांना जवळच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवलं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाने याबाबत माहिती दिली की, “या घटनेमुळे कोणतीही दुखापत झालेली नाही. तसंच, कोणत्याही मालमत्तेचेही नुकसान झालेले नाही.” टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वॉचडॉग फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या गॉडफ्रे पिमेंटो यांनी सांगितलं की, “मेट्रो लाईन ७ एच्या बांधकामादरम्यान रस्ता खचला. यामुळे जवळपासच्या इमारतींना धोका निर्माण झाला. रहिवाशांनी २३ ऑगस्ट रोजी रात्री १०.१० च्या सुमारास या घटनेची माहिती दिली. आमच्या माहितीनुसार, २४ फूट खोल आणि १० फूट रूंद रस्ता खचला. मेट्रो लाईन ७ए साठी जे कुमार कंत्राटदाराने २० ट्रक भरून सिमेंट काँक्रिटने हा भाग भरून काढण्यात आला आहे.”

हेही वाचा >> ‘मेट्रो १’मधून १० वर्षांत १०० कोटी प्रवाशांचा प्रवास

एमएमआरडीएच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, मेट्रो ७ ए साठी बोगदा खणत असताना भूगर्भातील पोकळी आणि कमकुवत मातीचा स्तर अनपेक्षितपणे खचला. पी अँड टी कॉलनीतील रस्त्यावर बोगदा तयार करण्याआधी ही परिस्थिती लक्षात आली नव्हती. त्यामुळे, त्याचं विश्लेषणही केलं गेलं नव्हतं”, असंही ते म्हणाले.

रस्त्याचा भाग खचल्याचं लक्षात आल्यानंतर टनेल बोरिंग मशिन्ससह बोगदा काढण्याचे कार्य ताबडतोब थांबविण्यात आले आणि मातीचा कमी झालेला भाग ग्राऊटिंग आणि काँक्रिटिंगद्वारे भरण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासच्या इमारतीतील रहिवाशांना तातडीने परिसरातील हॉटेलच्या खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं, असंही एमएमआरडीएने सांगितलं.

मेट्रो ७ ए स्थानकाचं वैशिष्ट्य काय?

गुंदवली – आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी ही ३.४४२ किमी लांबीची ‘मेट्रो ७ अ’ मार्गिका आहे. या मार्गिकेत एयरपोर्ट कॉलनी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा केवळ दोनच मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. तर ३.४४२ किमीपैकी २.४९ किमी मार्गिका भुयारी आहे. विशेष म्हणजे ही मार्गिका सुरुवातीला उन्नत असणार असून पुढे शेवटपर्यंत भुयारी असणार आहे. भुयारी आणि उन्नत मेट्रोमधून प्रवास सुलभतेने व्हावा यासाठी जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे १२ ते २८ मीटर इतके खोल भुयारीकरण (बोगदा) करण्यात येत आहे.