‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील पहिल्या मेट्रो गाडीच्या चाचणीला मंगळवारी सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी मंगळवारी ‘मेट्रो ३’च्या पहिल्या गाडीच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला आणि भुयारी मेट्रो धावली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते.

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे कारशेडच्या विरोधामागे पर्यावरणापेक्षा राजकीय हेतू अधिक होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसेच, आता ‘मेट्रो ३’ ला कोणीही रोखू शकणार नाही, असेही फडणवीस म्हणाले होते.

यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीसांनी केलेल्या एका ट्वीटमुळे चर्चा सुरू झाली आहे. ‘‘मुंबई मेट्रो आणि आमचे निर्णय हे कुणाच्या अहंकारासाठी नव्हे तर मुंबईकरांच्या सोयी, सुविधा आणि आरोग्यासाठी आहे.” असं फडणवीसांनी ट्वीट केलं आहे. तर, या ट्वीटमधून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.

‘‘मेट्रो ३ प्रकल्पात अनेक अडचणी आल्या. कारशेडचा वाद झाला. मात्र, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या सर्व अडचणी दूर केल्या. मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडमधील कामावरील स्थगिती उठविण्याचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. आता कारशेडचे काम सुरू झाले असून, मेट्रो प्रकल्पाचे कामही वेगात सुरू आहे.”, असे फडणवीस या अगोदर म्हणाले होते.

राजकीय प्रदूषण दूर : मुख्यमंत्री

मेट्रो -३ प्रकल्पातील आरे कारशेडमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल आणि प्रदूषण वाढेल, अशी ओरड वारंवार करण्यात येत आहे. मात्र, या प्रकल्पातील राजकीय प्रदूषण आता दूर झाले आहे, अशी टोलेबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे नमूद केल़े युतीच्या काळात सुरू झालेले हे प्रकल्प मध्यंतरी मंदावले होते. आता आमचे सरकार सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader