विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मुंबई मेट्रो रेल्वेला रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी शुक्रवारी सुरक्षा प्रमाणपत्र दिल्याने या वाहतूक सेवेच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. मात्र, मेट्रोच्या डब्यांना रेल्वे बोर्डाकडून अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने मेट्रो कधी सुरू होणार, याची घोषणा केली गेलेली नाही. प्रत्यक्षात विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मेट्रो सुरू करण्यात विलंब केला जात असल्याचे समजते.
मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी अत्यावश्यक असे रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र अखेर शुक्रवारी मिळाले. रेल्वे आयुक्तांचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आठवडाभरात ही रेल्वे सुरू केली जाईल, असे मुंबई मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार मिश्रा यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यामुळे येत्या आठवडाभरात मेट्रो सुरू होईल, अशी मुंबईकरांना वाटू लागली होती. परंतु आता रेल्वे बोर्डाकडून डब्यांची मंजुरी मिळाली नसल्याने मेट्रो सुरू करता येणार नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ही मेट्रो रेल्वे सुरू होण्यासाठी कोणता मुहूर्त साधला जातो, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात ही रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. तर मेट्रो नेमकी कधी सुरू होणार हे सांगण्यास रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता व्यक्त केली. डब्यांसाठीची मंजुरी मिळाल्यानंतरच मेट्रो सुरू होईल, असे मोघम उत्तर मेट्रोच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा