मुंबई : ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरून प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई – तिकीट घेण्याची, मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही. आता फक्त मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) स्कॅन करून ‘मेट्रो १’मधून प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘मेट्रो १’मधून प्रवास करण्यासाठी अनोखी मनगटावरील पट्टयाची तिकिट सेवा बुधवारपासून सेवेत दाखल केली आहे. हा पट्टा मेट्रो स्थानकावर स्कॅन करून प्रवाशांना प्रवास करता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेट्रो १ मार्गिकेवरील प्रवास सुकर, सोपा व्हावा यासाठी एमएमओपीएलकडून विविध सेवा पुरविल्या जात आहेत. ई तिकीट, व्हॉट्सअप तिकिट, विविध प्रकारच्या पासचा यात समावेश आहे. प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागू नये, तिकिट काढण्यात त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी नवनवीन सेवा एमएमओपीएलकडून दिल्या जात आहेत. आता त्यात मनगटावरील बॅण्डची भर पडली आहे. घड्याळाप्रमाणे मनगटावरील बँड स्कॅन करून आता प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. मेट्रो १ मार्गिकेवरील सर्व स्थानकांवर या बॅण्ड विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हा पट्टा २०० रुपयांना उपलब्ध असून सोयीनुसार रिचार्ज करून त्याचा प्रवाशांना वापर करता येणार आहे. तसेच त्याला बॅटरीची गरज नाही, तो जलरोधक आणि टिकाऊ आहे.

हेही वाचा…अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष

त्यामुळे पावसाळ्यातही तो वापरता येईल. हा पट्टा धुता येतो, स्वच्छ करता येतो. यामुळे त्वचेला कोणतीही इजा होणार नसल्याचा दावाही करण्यात आला आहे. एमएमओपीएलने बिलबॉक्स प्युररिस्ट टेक सोल्युशन्स या कंपनीच्या सहकार्याने मनगटावरील बॅण्डची संकल्पना पुढे आणून प्रत्यक्षात उतरवली आहे. सिलिकॉनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या बॅण्डचा वापर करणे अगदी सोपे आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमओपीएलकडून व्यक्त केला जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro introduces wristband ticketing for metro 1 route no need for paper or mobile tickets mumbai print news psg