कारशेडसाठी आरक्षण बदलण्यास विरोध
कुलाबा ते सिप्झदरम्यानच्या मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास असलेला विरोध कायम ठेवत शिवसेनेने संबंधित जागेचे आरक्षण बदलण्यास विरोध करणारा प्रस्ताव गुरुवारी मंजूर करवून घेतला. विशेष म्हणजे, जिजामाता उद्यान प्रवेश शुल्क वाढ आणि मालमत्ता करसवलत या मुद्दय़ांच्या प्रस्तावाच्या वेळी मूग गिळून गप्प असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी मेट्रो कारशेडच्या प्रस्तावावेळीही मौन बाळगल्याने कोणत्याही आडकाठीविना हा प्रस्ताव संमत झाला.
मेट्रो ३ साठी कारशेड बनवण्यासाठी आरे वसाहतीमधील प्रजापूर व वेरावली येथील ३३ हेक्टर भूखंड देण्यात आला आहे. मात्र कारशेड करण्यासाठी या भागाचे ना विकास क्षेत्राचे आरक्षण बदलण्याची गरज आहे. हे आरक्षण बदलण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सुधार समितीत प्रस्ताव आला. मात्र आरे वसाहतीतील जागेची पाहणी केल्यावर सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. आरे वसाहत येथील हरितपट्टय़ाचा विनाश व आदिवासींचे व्यवस्थापन या दोन्ही कारणांमुळे आरे वसाहतीत मेट्रो कारशेडला विरोध असल्याचे अनंत नर यांनी स्पष्ट केले होते. यासंबंधी सुधार समितीत भाजपच्या नगरसेवक सदस्यांना बोलण्याची संधीही देण्यात आली नाही. समितीने मेट्रो कारशेडला केलेल्या विरोधाच्या शेऱ्यासह व आरक्षण न बदलण्याच्या शिफारशीसह प्रस्ताव सभागृहात पुकारला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रस्ताव पुकारल्याचे भाजपच्या नगरसेवकांना लक्षातही आले नाही. त्यामुळे या प्रस्तावाला कोणताही विरोध झाला नाही व मिनिटभरात प्रस्ताव मान्य झाला. मालमत्ता करात सवलत व जिजामाता उद्यानातील शुल्कवाढीनंतर मेट्रो कारशेडला विरोध करणारा प्रस्ताव मान्य करत सेनेने भाजपवर कडी केली.
राज्य सरकारला अधिकार
आरे वसाहतीत मेट्रो कारशेडसाठी जागेचे आरक्षण बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आरक्षण बदलण्यास विरोध केला तरी नगरविकास खात्याकडून आरे कॉलनी येथे मेट्रो कारशेड करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.