Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३ ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. आज सकाळी हा मार्ग सकाळी साडेआठ वाजल्यपासून सुरू होणार आहे. सकाळी साडेसहाला सुरू होणारी सेवा अद्याप सुरू झाली नसून सकाळी साडेआठ ते रात्री साडेदहापर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. त्यानुसार प्रवाशांनी आपल्या प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन मुंबई मेट्रोकडून करण्यात आलं आहे.

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ (आरे) भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर आता अगदी काही दिवसातच बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा २ अ टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या टप्प्याच्या संचलनाच्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) आणखी एक पाऊल पुढे उचलले आहे. एमएमआरसीकडून आरे – बीकेसी आणि बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात करण्यात आली. या चाचण्यांसाठी आरे – बीकेसी मार्गिकेवरील गाड्यांच्या वेळापत्रका बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी साडेसहा वाजता सुरू होणारी सेवा आज सकाळी साडेआठ वाजता सुरू होणार आहे.

“दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी तांत्रिक कारणामुळे मेट्रो-३ च्या सेवा सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत उपलब्ध असतील”, अशी एक्स पोस्ट मुंबई मेट्रो ३ च्या अधिकृत एक्स खात्यावरून करण्यात आली आहे.

एमएमआरसीच्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. आता लवकरच अवघ्या काही दिवसांत बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक, वरळी दरम्यानचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या टप्प्याच्या संचलनासाठीची सध्या सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.