मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळ-नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८’ मार्गिकेचा आराखडा अखेर सिकडोने तयार केला असून हा आराखडा लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सिडकोने मूळ आराखड्यात काहीसा बदल करून ही मार्गिका आता दोन विमानतळांबरोबरच मुंबईतील महत्त्वाच्या अशा लोकमान्य टिळक टर्मिनसशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच आराखड्यात लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रो स्थानक समाविष्ट करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी मोठ्या संख्येने गाड्या सुटत नाहीत. टर्मिनस मेट्रोने जोडल्यास भविष्यात येथून महाराष्ट्राच्या इतर भागासाठी सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो ८’ मार्गिकेची उभारणी एमएमआरडीए आणि सिडको संयुक्तपणे करणार होते. मात्र नगर विकास विभागाने २७ जानेवारी २०२५ रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करून या मार्गिकेची सार्वजनिक-खासगी सहभागातून उभारणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच आराखड्यासह निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्पाची उभारणी करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. त्यानुसार ‘मेट्रो ८’चा सुधारित आराखडा नुकताच सिडकोने तयार केल्याची माहिती सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आराखड्यानुसार ही मार्गिका ३५ किमी लांबीची असून यापैकी मुंबई विमानतळ – छेडानगर दरम्यानची ९.२५ किमी लांबीची मार्गिका भुयारी आहे. छेडानगर-नवी मुंबई विमानतळादरम्यान मेट्रो ८ मार्गिका उन्नत असणार असून उन्नत मार्गिकेची लांबी २५.६३ किमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या मार्गिकेसाठी २० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आता मार्गिकेचा सुधारित आराखडा तयार झाल्याने लवकरच तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. आराखड्यास मान्यता मिळाल्यानंतर सिडकोकडून पुढील कार्यवाही करून निविदा काढण्यात येणार आहेत.