मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील वाहतूक सेवेत दाखल झालेल्या आरे – बीकेसी टप्प्यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘मेट्रो कनेक्ट ३’ ॲप कार्यान्वित केले आहे. मात्र मंगळवारपासून या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. ॲन्ड्राॅईड मोबाइलवरून ॲप अपडेट केल्यानंतर तात्काळ ते बंद (क्रॅश) होत आहे. मंगळवारी रात्रीपासून असे प्रकार समोर येत आहेत. ॲप बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना तिकिट रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी एमएमआरसीकडून पुढील सूचना येईपर्यंत ॲन्ड्राॅईड मोबाइलवरून ॲप अपडेट करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता

आरे – बीकेसीदरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मार्गिकेची सर्व माहिती उपलब्ध व्हावी, तिकिटासाठी रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी एमएमआरसीने ‘मेट्रो कनेक्ट ३’ ॲप कार्यान्वित केले आहे. इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे. या ॲपचा वापर मोठ्या संख्येने प्रवासी करीत आहेत. हे ॲप मंगळवारी रात्रीपासून बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. ॲन्ड्राॅईड मोबाइलवर ॲप अपडेट करण्यासंबंधीचे नोटीफिकेशन येत आहे. ॲप अपडेट होत असतानाच अचानकते बंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘आयफोन’धारक प्रवाशांना मात्रही ही अडचण येत नसल्याचे समजते. ॲप बंद झाल्याने प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकिट काढावे लागत आहे. एकूणच या तांत्रिक अडचणीची एमएमआरसीने दखल घेतली आहे. ही तांत्रिक अडचण गुगलशी संबंधित आहे. त्यामुळे गुगलशी संपर्क साधून तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली. ही अडचण दूर होऊपर्यंत प्रवाशांनी ॲप अपडेट करू नये, असे आवाहनही एमएमआरसीने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro mmrc appeal metro passenger do not update connect 3 app due to technical glitch mumbai print news css