मुंबईतील बहुप्रतिक्षीत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी उद्याचा (रविवार)चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. एमएमओपीएल प्रशासनातर्फे आज(शनिवार) मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती देण्यात आली. त्यामुळे मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे उद्या घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर दुपारी १ वाजल्यापासून धावणार आहे. एमएमओपीएलने मेट्रोच्या तिकीटांचे दर जाहीर केले असून, सुरूवातीच्या तीन दिवसांसाठी प्रवाशांना किमान १० रूपये मोजावे लागणार आहेत. मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरांवरून रिलायन्स आणि सरकारमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे मेट्रो सुरु होण्यास विलंब होत होता. मात्र, रिलायन्सने उद्या कोणत्याही परिस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा केली असून तिकीटाचे किमान दर रु.१० आणि कमान दर रु. ४० असा निश्चित केला आहे.  दरम्यान, याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना तिकीट दरांबाबत तोडगा न निघाल्यास आपण मेट्रोच्या उद्घाटनाला हजर राहणार नसल्याचे सांगितले होते. यावर रिलायन्सने सरकारतर्फे कोणीही आले नाही तरी मेट्रोचे उद्घाटन होणारच अशी भूमिका मांडत सरकारच्या भूमिकेला आव्हान दिले आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मेट्रो रेल्वेच लवकरात लवकर उद्घाटन करावे यासाठी भाजपकडून दबाव आणण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आंदोलन केले. मेट्रो रेल्वेच्या प्रवासी भाड्यावरून सरकार आणि रिलायन्समधील वाद आता आणखीनच चिघळल्यामुळे मेट्रो रेल्वे सुरू होण्यास विलंब होताना दिसत आहे.   या प्रकल्पाच्या किंमतीमध्ये ४३२१ कोटींची वाढ झाल्यामुळे रिलायन्सने प्रवासीभाड्याच्या दरांत वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने रिलायन्सच्या या प्रस्तावास स्पष्टपणे नकार दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा